पाच-पाच पैशांचं खणखणीत ‘सोशल वर्क’

पाच-पाच पैशांचं खणखणीत ‘सोशल वर्क’

कोल्हापूर - पाच पैशांचे नाणे चलनातून हद्दपार झाले. तथापि, याच पाच-पाच पैशांतून उभारणाऱ्या निधीतून येथील धान्य व्यापाऱ्यांनी आदर्श ‘मॉडेल’ दिले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात येथील धान्य व्यापारी पुढे सरसावले. एक- दोन पैसे अशी रक्कम गोळा झाली आणि १९२१ मध्ये सुरू झालेले त्यांचे शैक्षणिक कार्य आता शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. 

येथील लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापाऱ्यांची ही संस्था. इंग्रज राजवटीत अंधारमय जीवन जगणाऱ्या समाजाला शिक्षणाची गरज ओळखून ही संस्था उभी करण्यात आली. सोमवार पेठेतील बळवंत शिंदे, शनिवार पेठेतील विरूपाक्ष नष्टे, शाहूपुरीतील शांतिनाथ हेरवाडे आदी व्यापाऱ्यांनी या कामामध्ये पुढाकार घेतला. संस्थेच्या माध्यमातून कुणी एक पैसा, कुणी दोन पैसे, तर कुणी पाच पैसे अशा प्रमाणात संस्थेकडे बालकल्याण निधी जमा करू लागले. त्यातून उपेक्षित, दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षण कार्याला प्रारंभ झाला. संस्थेच्या या कार्याची पोचपावती म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी संस्थेला लक्ष्मीपुरीत मुख्य रस्त्यावर जागा दिली. मग या कार्याने वेग घेतला. संस्था सुरवातीला अनाथ बालकाश्रम म्हणून स्थापन झाली. कालांतराने ‘अनाथ’ हा शब्द उचित वाटेना म्हणून ‘कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्था’ असे नामकरण झाले. 

बालकल्याण शैक्षणिक उपक्रमांतर्गत वीस टक्के निधी आणि काही व्यापाऱ्यांकडून बिनव्याजी वीस लाख रुपये घेऊन धान्य व्यापारी भवन उभारले. त्यातून आता संस्थेला उत्पन्न सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांकडून घेतलेली रक्कम परत केली जाईल आणि नंतर या उत्पनातूनही बालकल्याण उपक्रमासह इतर सामाजिक कामासाठी निधी खर्च केला जाईल.
-राजेंद्र लकडे,
अध्यक्ष

काय आहे संकल्पना?
बाजारपेठेत मालाची विक्री होताना प्रतिपोते पाच पैसे निधी संस्थेकडे जमा होतो. १९२१ मध्ये केवळ २५ रुपये जमा होणारा निधी १९४० मध्ये तीनशे, १९८५ मध्ये ९० हजार, तर सध्या तो दोन ते अडीच लाखांवर पोचला आहे. सुरवातीला तीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललेली ही संस्था प्रत्येक वर्षी एक हजारांहून अधिक गरीब विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे गणवेश, वह्या-पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक पारितोषिके, बालकल्याण पुरस्कार, श्री शाहू विद्यार्थी वसतिगृह, शाहू लायब्ररी आणि धान्य व्यापारी भवन अशी बहुउद्देशीय कार्ये संस्थेतर्फे सुरू आहेत. 

यशोलौकिकाचे शिलेदार
बालकल्याण उपक्रमांतर्गत शैक्षणिक लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे मोठ्या पदांवर पोचले. सुभाष तोडकर शिक्षक झाले आणि त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहास विभागासाठी त्यांनी काम केले. अनिल गद्रे बॅंकिंग अधिकारी झाले. अण्णासाहेब सन्नकी आणि मारुती नष्टे हे पुढे मोठे व्यापारीच झाले.ं आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्या सुरवातीच्या काळात संस्थेने आर्थिक पाठबळ दिले. ही त्यांपैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे. 

संस्थेचे सभासद
धान्य व्यापारी म्हणून आवश्‍यक सर्व सरकारी परवाने घेऊन व्यापार करणाऱ्यांनाच कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि धान्य व्यापारी मंडळाकडे सभासद होता येते. ही संख्या सध्या अनुक्रमे २५५ आणि १६९ अशी आहे. ही मंडळी आजदेखील वर्षाला विक्री केलेल्या धान्याच्या प्रतिपोत्यामागे पाच पैसे याप्रमाणे निधी जमा करतात आणि त्यातील ८० टक्के रक्कम एक हजार मुलांसाठी खर्च करतात. उर्वरित रक्कम संस्थेच्या इतर कामांसाठी वापरली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com