‘सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन’मध्ये ५७९ प्रस्तावांना ग्रीन सिग्नल

‘सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन’मध्ये ५७९ प्रस्तावांना ग्रीन सिग्नल

कोल्हापूर - ‘सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन’ प्रक्रियेत कोल्हापूर विभागातून सुमारे ११४९ पैकी ५७९ प्रस्ताव पात्र ठरले असून, ऐंशी प्रस्तावांना ‘रेड’ सिग्नल दिला आहे. एकविध संघटनांच्या चौदा वर्षांखालील सब ज्युनिअर क्रीडा स्पर्धांतील प्रमाणपत्रे अपात्र ठरविण्यात आली असून, कराटेचे सुमारे बावीस प्रस्ताव प्रलंबित आहेत. कोणती कराटे संघटना अधिकृत, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने प्रस्ताव पाठविलेल्या खेळाडूंत धाकधूक आहे.  

 सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतून क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव आले आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे एखाद्या खेळाडूला नोकरी लागल्यानंतर त्याच्या प्रमाणपत्रांचे व्हेरिफिकेशन केले जात होते. मात्र, नोकरी लागण्यापूर्वीच खेळाडूने प्रमाणपत्रांचे व्हेरिफिकेशन करावे, असा शासन स्तरावर निर्णय झाला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे २००५ ते २०१६ पर्यंत सुमारे साडेचार हजार प्रस्तावांचे व्हेरिफिकेशन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आता त्या त्या जिल्ह्यातील क्रीडा उपसंचालक कार्यालयांवर व्हेरिफिकेशनची जबाबदारी सोपवली आहे. 

कोल्हापूर विभागातून ११४९ प्रस्तावांपैकी ५७९ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. एकविध खेळांच्या संघटनांच्या सबज्युनिअर चौदा वर्षांखालील सर्व खेळांची प्रमाणपत्रे अपात्र ठरवली असून, शालेय स्तरावरील सबज्युनिअर चौदा वर्षांखालील प्रस्ताव मात्र पात्र ठरविण्यात आले आहेत. कराटेच्या संघटनांचे फोफावलेले पीक लक्षात घेता नेमकी कोणती संघटना अधिकृत, कोणत्या संघटनेला महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता आहे, याचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याने कराटेपटूंनी पाठविलेल्या प्रस्तावांचा निर्णय प्रलंबित आहे. ही स्थिती कयाकिंग व कनोईंग खेळाबाबतही आहे. 

एशियन, कॉमनवेल्थ, ऑलिंपिक स्पर्धेत जे खेळ खेळले जातात, अशा सुमारे बेचाळीस खेळ प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी निश्‍चित केले आहेत. त्यात खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ यांचाही समावेश आहे. एशियन स्पर्धा २०१८ला होत असल्याने यात आणखी खेळांची वाढ होण्याची शक्‍यता असून, हा आकडा वाढूही शकतो. गुगलवर ऑलिंपिकच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन लिस्ट ऑफ गेम्समध्ये खेळांची यादी दिली असून, कोणते खेळाडू व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरू शकतात, हे खेळाडूंना समजू शकते. गेल्या दोन महिन्यांपासून व्हेरिफिकेशनचे काम क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू असल्याचे क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार यांनी सांगितले. साधारणपणे प्रस्ताव पाठविल्यानंतर वीस दिवसांत व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, राज्य संघटनांकडून कागदपत्रे वेळेत उपलब्ध झाली नाहीत तर अडचण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 नोकरीच्या पाच टक्के निकषासाठी स्तरनिहाय नोकरीत मिळणारा ‘क्‍लास’ असा : 
 * एशियन, कॉमनवेल्थ व ऑलिंपिक गेम्समध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असल्यास - अ

 * राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक असल्यास - ब, क, ड

 * वरिष्ठ राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक असल्यास - क, ड

 प्रस्ताव पाठवताय..? हे लक्षात ठेवा..
 संबंधित जिल्हा संघटना महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व इंडियन ऑलिंपिक असोसिएशनला संलग्नित आहे का?
  प्रस्ताव क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे पाठवा.
 राज्य संघटनांकडून कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्यावर व्हेरिफिकेशनचे काम अवलंबून असेल.
  शालेय स्तरावरील प्रस्तावांसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कागदपत्रे उपलब्ध केली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com