जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा प्रारंभ

निवास मोटे
सोमवार, 19 मार्च 2018

जोतिबा डोंगर - गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. यात्रेचा मुख्य दिवस ३१ मार्च असून कामदा एकादशीला भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात होईल. 

जोतिबा डोंगर - गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. यात्रेचा मुख्य दिवस ३१ मार्च असून कामदा एकादशीला भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात होईल. 

आज जोतिबा डोंगरावर तसेच राज्यभरातून चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या मानाच्या सर्व सासनकाठ्या आकर्षक सजावटीने दिमाखात उभ्या केल्या. आज श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील सरदारी रूपातील महापूजा पुजारी यांनी बांधली. सकाळी साडेअकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहादूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी दाखल झाली. हलगी, पिपाणी, सनईच्या सुरात भाविक, ग्रामस्थ, पुजारी यांनी ही सासनकाठी नाचविली. आज रविवार असल्याने गर्दी होती. त्यामुळे आलेल्या भाविकांनी काठीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.

गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता 
जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेच्या कालावधीत सलग चार दिवस सुट्टी असल्याने गर्दीचा उच्चांक होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा व सर्व शासकीय यंत्रणेवरही हाऊसफुल्ल गर्दीमुळे लोड येणार आहे. 

शुक्रवारी विशेष बैठक
जोतिबा देवाची यात्रा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने जय्यत तयारी सुरू केली आहे. नारळ, खोबरे, गुलाल, मेवामिठाई यांचे व्यापारी डोंगरावर दाखल झाले आहेत. २३ तारखेला शासकीय यंत्रणेची विशेष बैठक होत आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते व शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या वेळी काठीच्या मुख्य मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. काठीसोबत रणजितसिंह चव्हाण सरकार, संग्रामसिंह चव्हाण सरकार, सरपंच डॉ. रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादण, माजी सरपंच शिवाजीराव सांगळे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अधीक्षक महादेव दिंडे, लक्ष्मन डबाणे, सिंदीया देवस्थानचे अधीक्षक आर. टी. कदम पुजारी व सर्व देवसेवक उपस्थित होते. दुपारी बारा वाजता ही मानाची सासनकाठी सदरेवर उभी करण्यात आली. त्यानंतर जोतिर्लिंग मंदिराच्या मंडपात गुढीपाडवानिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे पंचांग वाचनाचा सोहळा झाला. केदारी उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले. 

दरम्यान, आज पाडळी निनाम (विहे, जि. सातारा), (कसबे डिग्रज, ता. मिरज), (कसबा सांगाव, ता. कागल), (किवळ, ता कराड), यांच्यासह इतरही ९६ मानाच्या सर्व सासनकाठ्या ज्या त्या गावात उभ्या करून चैत्र यात्रेसाठी जाण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले, असे सासनकाठी प्रमुखांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Chaitra Yatra starts