फाळकूटदादांचा बीमोड करण्याचे कोल्हापूरच्या नवीन एसपींसमोर आव्हान

सुधाकर काशीद
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांनी मनात आणले तर काही तासांत ते या काळे धंदेवाल्यांच्या  मुसक्‍या बांधू शकतील. कारण देशमुख यांनी भल्या भल्या नक्षलवाद्यांना जेरीस आणल्याचा इतिहास ताजा आहे. 

कोल्हापूर - गल्लीत, पेठेत एखादा दादा असतो. तो जरूर आपल्या शब्दावर, अप्‌प्रवृत्तीवर जरब बसवू शकतो. याचे कारण तो दादा नैतिकदृष्ट्या अतिशय प्रामाणिक असतो. समाजातही त्याच्या शब्दाला मान असतो; पण कोल्हापूर, इचलकरंजीत जुगार, खासगी सावकारी, जागा खरेदी व्यवहार, मटका, खंडणी, व्हिडिओ गेम्स असल्या व्यवसायात गुंतलेले ‘दादा’ झाले आहेत.

काळ्या धंद्यातून तयार होणाऱ्या पैशातून बेरोजगार तरुणांच्या टोळ्या त्यांनी पोसल्या आहेत. रोज कोठे ना कोठे त्यांचा राडा चालू आहे. नवीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांनी मनात आणले तर काही तासांत ते या काळे धंदेवाल्यांच्या  मुसक्‍या बांधू शकतील. कारण देशमुख यांनी भल्या भल्या नक्षलवाद्यांना जेरीस आणल्याचा इतिहास ताजा आहे. 

कोल्हापूर, इचलकरंजीत सहजपणे आणि बिनधास्त पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणजे काळा धंदा झाला आहे. जरा नाव झाले की, त्या बळावर जागा खरेदी, भाडेकरू मालक वाद, आर्थिक देणी-घेणी असली प्रकरणे मिटवण्यावरच त्यांचा भर आहे. वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असणारे वाद हे गुंड दादागिरीवर काही दिवसांतच संपवू लागले आहेत. दहा-बारा जणांचे टोळके पोसणे एवढेच या गुंडांचे भांडवल आहे. आणि त्या बळावर वाद संपवून त्यांची बक्कळ कमाई सुरू झाली आहे. 

कोल्हापुरातील हे लॅंडमाफिया गुन्हेगार तर इथल्या बांधकाम क्षेत्रालाही खूप मोठा धक्का देणार आहेत. कोल्हापुरात २४ तास जुगारअड्डे सुरू आहेत. दोन जुगार अड्डयांच्या दोन मालकांनी जोरदार हवा केली आहे. रोज अनेकांना कंगाल करणारे हे जुगार अड्डे शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू आहेत. अभिनव देशमुख यांनी एकदा तेथे नजर टाकली तरी तेथे कोणाकोणाची ऊठबस आहे, हे त्यांच्या ध्यानी येईल.

कोल्हापुरात नवीन डीएपीपी आले की त्यांचे पेढे-हारतुऱ्यांनी स्वागत करायचे. त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायची ही प्रथा आहे. यात सामान्य माणूस कोठेही नसतो. श्री. देशमुख यांनी भल्या भल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजीतल्या या पोकळ गुंडांना सरळ करणे त्यांच्या दृष्टीने खूप छोटे काम आहे. परंतु, हेच काम कोल्हापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठे ठरणार आहे. 

...तर नाव कायम राहील
ठरावीक पोलिस गुंडांच्या, काळे धंदेवाल्यांच्या संपर्कात किती असतात, याची छाननी करणे खूप सोपे आहे. अभिनव देशमुख यांनी हे मनावर घेतले तर कोल्हापुरात त्यांचे कायम नाव राहणार आहे, जे यापूर्वी शिवप्रताप यादव, मीरा बोरवणकर, संजय कुमार, शहाजी उमाप यांनी करून दाखवले आहे.

Web Title: Kolhapur News challenges in front of New SP Abhinav Deshmukh