चंदगड मतदारसंघ - निमित्त वाढदिवसाचे, निशाणा विधानसभेचा

सुनील कोंडुसकर
सोमवार, 18 जून 2018

चंदगड - विधानसभेच्या आखाड्याला वर्षाचा कालावधी असला तरी त्याचे रणशिंग वाजायला सुरवात झाली आहे. सत्तारुढ भाजप, शिवसेना एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीपूर्वी एकत्र येणार की नंतर, अन्य पक्षांच्या भुमिका काय रहाणार याबाबत अजून ठाम निर्णय नसला तरी इच्छुकांनी आपले घोडे दामटायला सुरवात केली आहे

चंदगड - विधानसभेच्या आखाड्याला वर्षाचा कालावधी असला तरी त्याचे रणशिंग वाजायला सुरवात झाली आहे. सत्तारुढ भाजप, शिवसेना एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीपूर्वी एकत्र येणार की नंतर, अन्य पक्षांच्या भुमिका काय रहाणार याबाबत अजून ठाम निर्णय नसला तरी इच्छुकांनी आपले घोडे दामटायला सुरवात केली आहे. चंदगड मतदारसंघात तर प्रस्थापित नेत्यांबरोबरच इतर चेहऱ्यांची चर्चा सुरु झाली आहे. वाढदिवस हे त्यासाठीचे औचित्य आहे. गेल्या आठवड्यात उद्योजक रमेश रेडेकर यांनी हा निशाणा साधला. त्यापाठोपाठ गोकुळचे संचालक राजेश पाटील यांनी वडिल कै. नरसिंगराव पाटील यांचा वारसा पुढे नेताना आपणही विधानसभेसाठी इच्छुक आहोत हे दाखवून दिले. 

रमेश रेडेकर यांना जादूई उमेदवार मानले जाते. अत्यंत संघर्षाच्या वातावरणातून त्यांनी घेतलेली झेप. गावच्या सरपंचपदापासून ते जिल्हा परीषद सदस्य आणि कारखाना उपाध्यक्षापर्यंत मारलेली मजल हे त्यांचे वास्तव आहे. विधानसभा लढवणारच हा त्यांचा ठाम निर्णय आहे. त्या दृष्टीने तुडये- कोलीकपासून ते गडहिंग्लज तालुक्‍यातील विविध कार्यक्रमांसाठी ते उपस्थित लावत आहेत.

नरसिंगराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची धुरा पुत्र राजेश यांच्याकडे आली आहे. चंदगड आणि आजरा तालुक्‍यात त्यांना मानणारा गट आहे. हाच धागा पकडून त्यांनी या वेळी वाढदिवसाचे फ्लेक्‍स संपूर्ण मतदारसघात झळकवले. वाढदिवसाला शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेचे प्रतिनिधीत्व करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांनीही अप्रत्यक्षपणे आपण या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आजरा कारखाना, आजरा नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवल्याने अशोक चराटी यांच्या कार्यकर्त्यानाही आपल्या नेत्याने विधानसभेचा आखाडा अनुभवावा अशी इच्छा आहे. त्यांच्याकडूनही वातावरणाचा अंदाज घेण्याचे काम सुरु आहे. शारदा शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य जे. बी. पाटील यांनी चार महिन्यापूर्वी सेवानिवृत्ती निमित्त घेतलेल्या मेळाव्यात शक्तीप्रदर्शन केले. त्यातून त्यांनीही आपली इच्छाशक्ती प्रगट केल्याचे मानले जाते.

आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, प्रभाकर खांडेकर, अप्पी पाटील, अंजनाताई रेडेकर, स्वाती कोरी, अॅड. हेमंत कोलेकर, विद्याधर गुरबे या जुन्या चेहऱ्यांबरोबरच नवीन चेहऱ्यांची भर पडल्यामुळे या निवडणुकीत मतदारांसाठी एकास एक पर्याय असणार आहेत. यापैकी निवडणुकीचा फज्जा किती जण गाठतात हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे. 

Web Title: Kolhapur News Chandgad constituency special