चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘डॅमेज कंट्रोल’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळेल, हा उत्सुकतेचा विषय असला तरी यापूर्वीचा अनुभव पाहता या उमेदवारीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मान्यता मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने नेसरी येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी डॉ. बाभूळकर यांनी सासर-माहेरची परवानगी आणली तर त्याच या मतदारसंघातील उमेदवार असतील अशी घोषणा केली. सभेत श्री. मुश्रीफ यांच्या या घोषणेला पक्षाचे नेते अजित पवार यांनी आक्षेप घेत उमेदवारी कोणाला याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील, असे सांगत हा निर्णय मान्य नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले, पण श्री. मुश्रीफ यांच्या घोषणेने मतदारसंघात मात्र डॉ. बाभूळकर की श्रीमती संध्यादेवी कुपेकर याची चर्चा मात्र सुरू झाली. २०१२ साली बाबासाहेब कुपेकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून संग्रामसिंह कुपेकर यांचे नाव पुढे आले. पण श्री. पवार यांनी कै. कुपेकर यांच्या पत्नी श्रीमती संध्यादेवी यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये यात बदल होईल, असे वाटत असतानाच श्री. पवार यांनी पुन्हा त्यांनाच संधी दिली. 

सध्या राज्यात भाजप-सेनेचे सरकार असल्याने विद्यमान आमदारांना डावलून त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीचे धाडस होईल, अशीही शक्‍यता नाही. त्यामुळे अजित पवार यांनी बोलल्याप्रमाणे श्री. पवार हेच याचा निर्णय घेतील आणि तो श्रीमती संध्यादेवी यांच्या बाजूचाच असेल. 

जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ. बाभूळकर यांनी भाजपसोबत आघाडी केली. त्यात मिळालेल्या यशामुळे विधानसभेला त्याच भाजपच्या उमेदवार असतील, अशी चर्चा वर्षभरापासून होती. घरातच दोन वेगवेगळे पक्ष झाले, तर जागा राखण्यात अडचण निर्माण होईल, ही शक्‍यता गृहीत धरूनच कालच्या सभेत डॉ. बाभूळकर यांचे नाव पुढे करून त्यांचे भाजपकडे वळलेले पाय थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. कुपेकर हे महादेवराव महाडिक यांचे जवळचे नातेवाईक असूनही विधान परिषदेच्या निवडणुकीत कुपेकर गटाची मते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या पारड्यात पडली. 

या तालुक्‍यात ‘गोकुळ’च्या राजकारणाचा मोठा प्रभाव आहे. चंदगडमध्ये दोन व गडहिंग्लजमध्ये एक असे ‘गोकुळ’चे तीन संचालक या मतदारसंघात आहेत. यापैकी रामराजे कुपेकर हे कुपेकरांचे पुतणे असले तरी ते महाडिक यांचे जावई आहेत. त्यांच्यामुळेच ते संचालक मंडळात गेले. खासदार धनंजय महाडिक हेही कुपेकर यांच्या बाजूने असतील; पण श्री. महाडिक यांनीच वेगळा निर्णय घेतला तर गटप्रमुखांचा निर्णय खासदार महाडिक किंवा रामराजे यांच्याकडून डावलला जाण्याची शक्‍यता नाही.

संग्रामसिंह कुपेकरच विरोधात 
गेल्या निवडणुकीत ‘जनसुराज्य’चे उमेदवार असलेले श्रीमती कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह हेच पुढच्या निवडणुकीत त्यांचे विरोधक असतील. त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण असेल. ‘न्युट्रियन्स’मुळे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, ‘दौलत’ कारभारामुळे गोपाळराव पाटील बाजूला आहेत. ‘गोकुळ’च्या राजकारणात कै. नरसिंगराव पाटील गट व भरमू पाटील यांचे हात बांधले गेले आहेत. त्यांना महाडिक म्हणतील तसेच करावे लागेल. भाजपकडून रमेश रेडेकर रिंगणात असतील; पण त्यापेक्षा संग्रामसिंह हे संपर्काच्या जोरावर विरोधी उमेदवार असतील.

Web Title: kolhapur news chandgad ncp vidhansabha election politics