लोकसहभागातूनच विकास शक्‍य - चंद्रकांत दळवी

लोकसहभागातूनच विकास शक्‍य - चंद्रकांत दळवी

कोल्हापूर - ‘‘लोकसहभागातून केलेल्या विकासकामांमुळे गावाचेच नव्हे तर देशाचे चित्र बदलू शकते. त्यासाठी प्रत्येकाने गावासाठी तन, मन आणि धन देऊन निःस्वार्थीपणे कार्यरत राहिले पाहिजे’’, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे व्यक्त केली. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक पत्रमहर्षी डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित व्याख्यानात ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावर ते बोलत होते.  

श्री. दळवी म्हणाले, ‘‘राज्यातील ५५ ते ६० टक्के लोक, जनावरे आणि पीक-पाण्यासाठी तडफडत आहेत. पाणी आणि पैशाशिवाय विकासकाम किंवा जगण्याच्या गरजा भागविता येत नाहीत. निढळ (जि. सातारा) गाव ३५ वर्षांपासून लोकसहभागातूनच समृद्ध झाले आहे. येथील लोकांनीही स्वत: वर्गणी काढत दुष्काळी गावाला राज्यात आदर्श बनविले आहे. जलसंधारण, जलयुक्त शिवार, स्वच्छ ग्राम, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी शासनाची वाट पाहण्याऐवजी गावातील प्रत्येकाने किंवा ज्याने स्वत:चे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करत असणाऱ्यांनी मनात आणले तर तो आपले गावही आदर्श आणि सर्व सोयींनी सक्षम बनवू शकतो. त्यासाठी तन, मन आणि धन या तिन्ही बाबींचा वापर केला पाहिजे. गावात विविध गटतट असतात. पक्षांचे कार्यकर्ते, नेतेही असतात; पण गावात एखादे विकासकाम करायचे असेल तर ते विकासकाम कोणत्याही परिस्थितीत चांगले आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. गटतट व पक्ष सोडून आपण निःस्वार्थीपणे काम करून घेतले पाहिजे.

गटातटांचा गावातील विकासकामांवर कोणताही परिणाम होऊ देऊ नका. ज्या वेळी लोकसहभागातून लोक एखाद्या कामाचा पाठपुरावा करतात, त्या वेळी ते काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होते. त्यांचा दुरुस्ती खर्चही कमी येतो. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. नगर जिल्ह्यातील पारणे गावातून हागणदारीमुक्त गावाची संकल्पना सुरू झाली. हागणदारी हा शब्द जरी उच्चारला तरीही लोक हसत होते. एवढा मोठा अधिकारी आणि हागणदारी म्हणतो; पण याच लोकांना विश्‍वासात घेऊन लोक सहभागाचे महत्त्व पटवून दिल्याशिवाय मोहीम यशस्वीपणे राबली नसती. त्यासाठी गावात असो किंवा शहरात असो एखाद्या चांगल्या विचाराच्या आणि निःस्वार्थी लोकांनी गावातच पाय रोवून उभे राहिले पाहिजे.’’ 

श्री. दळवी म्हणाले, ‘‘लोकांना सकारात्मक दृष्टीने काम केलेले आवडते. शंभर पैकी ७० ते ८० टक्के लोक सकारात्मक आणि चांगले काम करण्यासाठी तयार असतात; पण त्यांना संघटित करून लोकसहभाग वाढविला पाहिजे. एकटा माणूस काही करू शकत नाही, तरीही त्याला अनेक लोकांचे पाठबळ मिळाल्यास प्रत्येक गोष्ट साध्य करता येऊ शकते. गावातील रखडलेल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक लोकांचे शिष्टमंडळ सरकारी अधिकाऱ्यांना भेटले तर ते काम तत्काळ मार्गाला लागते. हाच लोकसहभागाचा मोठा फायदा असतो. गावागावांत असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. ज्यांना कोणत्याही राजकीय अपेक्षेशिवाय गावाचा विकास साधता येईल. 

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या आवश्‍यक गरजा आहेत. तशा लोकांच्या भौतिक गरजा काय आहेत आणि त्या कशा पूर्ण करता येतील, यासाठी विचार केला पाहिजे. 
राज्य शासनाने सुरू केलेले जलयुक्त शिवार हे लोकसहभागाचे उत्तर उदाहरण आहे. ज्या ठिकाणी पाणी प्यायला मिळत नव्हते आता तिथे शेती फुलते. पाणी अडवा-पाणी जिरवा सारख्या योजनेला लोकसहभागातूनच बळ मिळाले आहे.’’ 

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘बदलत्या जगाविषयीची वेगळी दृष्टी घेऊन नानासाहेब परुळेकर वृत्तपत्रसृष्टीत आले. त्यांचा मूळ पिंड शिक्षकाचा. त्यामुळे वृत्तपत्राच्या चौकटीत राहून समाजशिक्षकाची भूमिका त्यांनी नेटाने पेलली. युरोप, अमेरिकेतील वृत्तपत्रांतील बदल त्यांनी अनुभवले असल्याने मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक नवे प्रवाह आणले आणि ते यशस्वी करून दाखवले. त्यांच्या याच शिकवणीतून ‘सकाळ’ माध्यम समूहाची सध्याची वाटचाल सुरू आहे.’’ 

या वेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित होते. कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी आभार मानले.

 गावच्या कामात राजकारण नको
श्री. दळवी म्हणाले, ‘‘सकारात्मक विकासासाठी गावातील लोक एकत्र येतात. या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याने पाय रोवून उभे राहिले पाहिजे. लोकांवर विश्‍वास टाकला की लोक आपल्यावर विश्‍वास ठेवतात. गटतट, मतभेद, मनभेद विसरून लोकसहभाग वाढविला पाहिजे. त्यातूनच चांगल्या कामाला ऊर्जा मिळत असते. ज्याला राजकारण करायचे आहे त्यांनी ते जरूर करावे; पण गावच्या कामात राजकारणाला थारा देऊ नका. ज्या गावांनी विकासकामात लोकसहभाग घेतला आहे. त्या गावांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे.’’

‘विधायक आणि विघातक’
श्री. दळवी म्हणाले, ‘‘गावात विधायक आणि विघातक अशा दोन प्रकारचे लोक असतात. विधायक असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तर विघातक कमी असतात. ती स्वत: काम करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काम करू देत नाहीत; पण विधायकतेचा वसा घेतलेल्यांना सोबत घेऊन काम केल्यास लोकचळवळ पुढे जाऊ शकते.’’

‘सकाळ’ने दहा लाखांचा निधी दिला’ 
निढळ (जि. सातारा) गावात जलसंधारणाच्या कामाचे उद्‌घाटन करताना गावातील लोकांचा उत्साह आणि सहभाग पाहून ‘सकाळ’ने दहा लाख रुपयांचा निधी दिला होता. २००३ मध्ये दिलेला हा निधी निढळ ग्रामस्थ अजूनही विसरलेले नाहीत. 

पोस्टकार्डमुळे झाला गावाचा कायापालट 
श्री. दळवी यांनी त्यांच्या मूळ गावाचे म्हणजे निढळचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर निढळ गावात सत्कार ठेवला होता. पाच हजार लोकसंख्येच्या गावात १२ जण या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच वेळी गावातील ज्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले ते हायस्कूल मोडकळीस आले होते. त्याचे वर्ग बंद पडत होते. हायस्कूल बंद पडले तर गावातील मुले शिकणार कशी म्हणून त्यांनी जे गावातून इतर ठिकाणी नोकरीसाठी बाहेर पडले आहेत त्या ७५० जणांना शाळा दुरुस्तीबाबत पोस्टकार्ड लिहिले. या वेळी ५५० जणांनी सहभाग घेऊन ती शाळा उभा करण्याचे काम केले. ३५ वर्षांपासून गावात लोकसहभागातूनच विकास काम केले जात आहे.’’ 

‘झिरो पेंडन्सीचा नागरिकांना फायदा’
श्री. दळवी म्हणाले, ‘‘झिरो पेंडन्सीत राज्यातील २८८ टन कागद नष्ट केले आहेत. तर ४८ लाख फाईल्स रेकॉर्डसाठी ठेवल्या आहेत. झिरो पेंडन्सीमुळे लोकांची कामे तत्काळ होणार आहेत. तसेच, झिरो पेंडन्सीमध्ये कामाचा कागद नष्ट करणाऱ्याला शिक्षा केली जाणार होती. त्यामुळे सर्व कागद वाचून आणि पडताळणी करूनच नष्ट केली.’’

‘बस डे’ आदर्श उपक्रम :
‘‘पुण्यातील ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी ‘सकाळ’ समूहाने पुण्यात ‘बस डे’ उपक्रम राबविला. शहरातील लोकांना एक दिवस बसने प्रवास करण्याचे आवाहन केले. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, हेच ‘सकाळ’चे लोकसहभागाचे खरे उदाहरण असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.

‘लोकसहभागाचे रोल मॉडेल’
श्री. दळवी म्हणाले, ‘‘काळासोबत बदलणारे ‘सकाळ’ सर्व वृत्तपत्रांच्या पुढे जाऊन लोकांना सहभागी करून घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ’ने तनिष्काच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना एकसंधपणे आपले परखड मत मांडण्याचे धाडस दिले. तर ‘यिन’च्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील तरुणांना एका धाग्यात बांधण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. हेच तरुण देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या कामात सहभागी होतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com