'चेतना'च्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील गहिवरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

"चेतना'चे शिलेदार 
चेतना विकास मंदिरच्या सुशांत कुंदे, वन्या करकरे, निखिल डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे यांचा या चित्रफितीत सहभाग आहे. त्यांचा कार्यक्रमात गौरव झाला. त्यांच्यासह ऍडॅप्ट (मुंबई), हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाईंड (मुंबई), कमला मेहता दादर स्कूल फॉर दि ब्लाईंड (मुंबई), कीर्ती कालरा व सिमरन कालरा (नवी दिल्ली) या शाळांतील मुलांचाही समावेश आहे. 

कोल्हापूर : जगामध्ये काहीही अशक्‍य नाही. सारे मिळून आता जिल्ह्यातील सारी दुःखं दूर करू या, असे आवाहन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. येथील चेतना विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत गायिले आहे. देशातील हा पहिलाच प्रयत्न असून या राष्ट्रगीताच्या चित्रफितीचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला. 

"या रे या सारे या...' या गीतावरील नृत्याविष्काराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या गीतातून केवळ बौध्दिक अक्षमच नव्हे तर बहुविकलांग मुलांच्या प्रश्‍नांचा वेध घेतला गेला. त्यानंतर राष्ट्रगीताच्या चित्रफितीचे अनावरण होवून ती दाखवण्यात आली. एकूण साराच माहौल बहुविकलांग मुलांच्या विश्‍वात गेला होता. मंत्री श्री. पाटील व्यासपीठावर बोलायला उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांना गहिवरून आले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आवाहन करून 19 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चेतना शाळेला भेट देणार असल्याचे सांगून त्यांनी लगेचच व्यासपीठ सोडले. मात्र, एकूण कार्यक्रमालाच भावूकतेची किनार लाभली. महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "कोल्हापुरातील विद्यार्थी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर राष्ट्रगीत गातात, ही तमाम कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. चेतना संस्थेसाठी आवश्‍यक ती सर्व मदत केली जाईल. किंबहुना ही संस्था पाहण्यासाठी देशभरातून लोक आले पाहिजेत, यासाठी निश्‍चित प्रयत्न केले जातील.'' 
महापौर हसीना फरास म्हणाल्या,""सामान्य मुलांपेक्षाही ही मुलं अधिक सक्षम आहेत. त्यांच्यातील विविध कला पाहिल्या की ते किती खंबीर आहेत, याची प्रचिती येते. महापालिकेकडून आवश्‍यक ते सर्व सहकार्य संस्थेला मिळेल.'' 

प्राचार्य खेबुडकर म्हणाले, "वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड या दिल्लीतील स्वयंसेवी संस्थांच्या विद्यमाने दोन वर्षांपूर्वी लघुपट महोत्सव येथे भरला होता. त्या वेळी सर्व विकलांग मुलांबरोबर अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीने सांकेतिक भाषेत राष्ट्रगीताच्या चित्रफितीची संकल्पना पुढे आली आणि ती आता प्रत्यक्षात उतरली. आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असून गोविंद निहलानी यांचे दिग्दर्शन आहे.'' 

दरम्यान, "भाजपा'चे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत झाले. उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले. सोनाली नवांगुळ यांनी सूत्रसंचालन केले. चेतना शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड, वि. म. लोहिया मुकबधीर विद्यालय, ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुलांचा कलाविष्कार यावेळी सजला. 

"चेतना'चे शिलेदार 
चेतना विकास मंदिरच्या सुशांत कुंदे, वन्या करकरे, निखिल डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे यांचा या चित्रफितीत सहभाग आहे. त्यांचा कार्यक्रमात गौरव झाला. त्यांच्यासह ऍडॅप्ट (मुंबई), हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाईंड (मुंबई), कमला मेहता दादर स्कूल फॉर दि ब्लाईंड (मुंबई), कीर्ती कालरा व सिमरन कालरा (नवी दिल्ली) या शाळांतील मुलांचाही समावेश आहे. 

विविध संस्थांना आवाहन 
राष्ट्रगीत अनावरण सोहळ्यानंतर ही चित्रफीत सर्वत्र उपलब्ध झाली आहे. विविध सेवाभावी संस्था, थिएटरमध्ये राष्ट्रगीतासाठी ही चित्रफीत वापरून विकलांग आणि विशेष मुलांच्या प्रश्‍नांबाबत जागर मांडण्याचे आवाहनही या वेळी पाहुण्यांनी केले. 

Web Title: Kolhapur news Chandrakant Patil Chetna organisation