पैलवान नीलेशच्या भावाला शासकीय नोकरी - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

आपटी - बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील कुस्तीच्या मैदानात गंभीर दुखापत होऊन मृत झालेला पैलवान नीलेश विठ्ठल कंदूरकर याच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आपटी - बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील कुस्तीच्या मैदानात गंभीर दुखापत होऊन मृत झालेला पैलवान नीलेश विठ्ठल कंदूरकर याच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंत्री पाटील यांनी नीलेशची पोलिस भरती होण्याची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा भाऊ सुहास याला शासकीय नोकरीत सामावून घेऊ, असे जाहीर केले. तसेच कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून भरघोस मदत देऊ, असे आश्वासन दिले. 

शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या खर्चाची जबाबदारी पालकमंत्र्यांनी उचलली. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात सुहासला सराव करण्यासाठी मोफत प्रवेश सुविधा दिली. रिकाम्या वेळेत पन्हाळा महसूल विभागाचे उपविभागीय किंवा तहसीलमध्ये तात्पुरते कंत्राटी पद्धतीवर सेवेत घ्यावे, असे आदेश दिले. तसेच कुटुंबीयांच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. या शेतकरी कुटुंबास महसूल विभागाकडून शेती उपयुक्त योजनांचा लाभ, तसेच कुटुंबीयांना घर-आरोग्य आणि शासन स्तरावरून देता येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ, सुविधा देऊ, असे ते म्हणाले.

उत्तरकार्यादिवशीच वाढदिवस
नीलेश विठ्ठल कंदूरकर याचे शनिवारी उत्तरकार्य होते. योगायोगाने याच दिवशी मृत नीलेशचा वाढदिवस होता. नीलेशच्या उत्तरकार्यादिवशीच त्याचा वाढदिवस असल्याने गावकऱ्यांनी काम बंद ठेवले. क्रीडा क्षेत्रातील युवकांनी शनिवारी रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करून नीलेशला श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावातील सर्व लोकांनी सहभाग घेतला. योगायोगाने नीलेशच्या उत्तरकार्यादिवशीच पालकमंत्री पाटील यांनी गावात येऊन नीलेशच्या नातेवाइकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी ‘तुम्हाला घर बांधून देऊ का?’ असे विचारले; पण ‘पोरापेक्षा कसलं घर’ अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. भाऊ सुहासने मृत नीलेशच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मी पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अजय पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रस्ताव तयार असून तातडीने पुढे पाठवू, असे सांगितले. तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी तहसील विभागाकडून लागणारी सर्व मदत पुरवू, असे आश्वासन दिले.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment