उत्तर कोल्हापूरातून उमेदवारी कोणाला हे पक्षच ठरवेल - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

कोल्हापूर - ‘विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमाराजे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील दावेदार आहेत. ऐनवेळी सुहास लटोरे व सुनील कदम यांचीही नावे पुढे येतील; पण उमेदवारी कोणाला, हे पक्ष ठरवेल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

कोल्हापूर - ‘विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमाराजे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील दावेदार आहेत. ऐनवेळी सुहास लटोरे व सुनील कदम यांचीही नावे पुढे येतील; पण उमेदवारी कोणाला, हे पक्ष ठरवेल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

पक्षाने सांगितले, तर उत्तरमधून चंद्रकांत पाटीलच निवडणूक लढवतील, असे म्हणत श्री. पाटील यांनी गुगलीही टाकली. मी निवडणूक लढविणार नाही, तरीही मी कोरे पाकीट आहे. पक्ष नाव देईल, त्या ठिकाणी मला जायला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. येथील आयर्विन ख्रिश्‍चन हॉलमध्ये भाजपच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बूथप्रमुखांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील भाजप ठरवेल ते दोन खासदार आणि दहा आमदार होतील, यात शंका नाही. दरम्यान, सर्वच मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा संपर्क मेळावा घेतला जात आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार हे पक्ष ठरवेल. कोल्हापूर उत्तरमधून अनेकांची नावे पुढे येत आहेत. गेल्यावेळी महेश जाधव यांना ४८ हजार व सत्यजित कदम यांना ५२ हजार मते मिळाली आहेत. विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना ६८ हजार मते मिळाली. जाधव आणि कदम आता एकाच व्यासपीठावर आहेत. त्यामुळे दोघांच्या मतांची बेरीज केली तर ९४ हजार मते होतात. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्‍चित आहे.’’

ते म्हणाले, ‘‘तरीही येथून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमा राजे, ऋतुराज पाटील भाजपकडून निवडणूक लढवितील, अशी चर्चा आहे. पक्षाने निश्‍चित केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्याला निवडून आणण्यासाठी इतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’ यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, बाबा देसाई, हिंदूराव शेळके, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

माणिकराव पाटील-चुयेकर यांना लवकरच खुषखबर दिली जाईल. त्यांना लाल दिव्याची गाडी देण्याची रचना पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करू नये.
-चंद्रकांत पाटील,
पालकमंत्री

महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधणार
माझा वाढदिन १० जूनला आहे. त्या दिवशी हार, तुरे, फुल किंवा वह्या आणू नयेत. महिलांना स्वच्छतागृह नाही, अशा ठिकाणी एका दिवसात स्वच्छतागृह बांधून दिले जाईल. यासाठी संवेदना या संस्थेकडे आपापल्या ताकदीनुसार निधी जमा करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केले.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment