शिरोळ तालुक्‍यात कॅन्सरचे प्रमाण वाढण्यास प्रदूषण हेच कारण - पाटील

डॅनियल काळे
बुधवार, 20 जून 2018

कोल्हापूर - शिरोळ तालुक्‍यात कॅन्सरचे प्रमाण वाढण्यास प्रदूषण हेच कारण आहे, असे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

कोल्हापूर - शिरोळ तालुक्‍यात कॅन्सरचे प्रमाण वाढण्यास प्रदूषण हेच कारण आहे, असे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

शेतामधून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यानेच कॅन्सर वाढत आहे. याला जबाबदार कोण? रासायनिक खते तर सरकारने आणून टाकली नाहीत? असा सवालही यावेळी त्यांनी केला.

कॅन्सरचे हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने निधीची तरतूद केली आहे. कॅन्सरची तपासणी केली जात आहे. तुर्त तरी या परिसरातील लोकांना पिण्याचे शुध्द पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी सरकारी निधीबरोबरच सीएसआर फंडही वापरुन लोकांना शुध्द पाणी देऊ.

-  चंद्रकात पाटील, महसुलमंत्री 

पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. शिरोळ परिसरात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याच्या प्रश्नाकडे यावेळी पत्रकांरांनी पालकमंत्र्याचे लक्ष वेधले. 

पुजारी नेमणूक घाईगडबडीत नाही - पालकमंत्री 
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूकीसंदर्भात सुरु असलेली प्रक्रिया कायदेशीरच असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री पाटील म्हणाले, अंबाबाई हे जागृत देवस्थान आहे. माझी तर श्रध्दा आहेच. पण करोडो लोकांचे श्रध्दास्थान म्हणून अंबाबाईकडे पाहीले जाते. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेताना घाईगडबड करुन चालणार नाही. लोकांच्या श्रध्दा आणि भावनांचा प्रश्‍न आहे. मंदिरातील हक्कदार पुजाऱ्याऐवजी पगारी पुजारी नेमणुकीसंदर्भात लोकांची मागणी होती. सरकार हे लोकांच्यासाठी आहे. त्यामुळे सरकारने लोकांची मागणीनुसार हा कायदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तो अंमलात आणण्याचे टप्पे आहेत. त्यामध्ये घाईगडबड करुन उपयोग नाही. लोकांच्या श्रध्दा आणि भावनांचा आदर होईल याची काळजी घेतली पाहीजे. 

पाणंद रस्ते होणार अतिक्रमणमुक्त 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री सडक योजनेप्रमाणेच पाणंद रस्ते करण्यासही प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. किती पाणंद रस्ते करायचे आहेत. किती रस्त्यांवर अतिक्रमण आहे. याबाबत लवकरच महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेणार आहे. या बैठकीत चर्चा होईल. आराखडा तयार केला जाईल आणि हे पाणंद रस्ते करण्यासाठी लागेल तो निधी देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व अन्य कांही स्त्रोतातून निधीची तरतूद करु. 

दलित वस्त्या सुधारणांसाठी जिल्ह्याला 10 कोटी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यशासनाने राज्यभरातील दलित वस्ती सुधारणा करण्यासाठी 300 कोटीची तरतूद केली होती. यातून प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटी रुपये मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यालाही 10 कोटी मिळणार आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर दलित वस्त्या सुधारण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment