शेतकऱ्यांचा संप चिघळण्याचा दोन्ही कॉंग्रेसकडून प्रयत्न - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर - राजकीय दुकाने बंद होण्याच्या भीतीपोटीच शेतकऱ्यांचा संप अधिक चिघळत कसा राहील, असाच प्रयत्न दोन्ही कॉंग्रेसवाल्यांचा राहिला. आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, ती त्याला दोन्ही कॉंग्रेस जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून, भविष्यातही शेतकऱ्यांच्या मागे ठाम राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. 

कोल्हापूर - राजकीय दुकाने बंद होण्याच्या भीतीपोटीच शेतकऱ्यांचा संप अधिक चिघळत कसा राहील, असाच प्रयत्न दोन्ही कॉंग्रेसवाल्यांचा राहिला. आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, ती त्याला दोन्ही कॉंग्रेस जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून, भविष्यातही शेतकऱ्यांच्या मागे ठाम राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. 

पाटील म्हणाले, कुणाला हाताशी धरून संप मोडलेला नाही. मुळात पुणतांबे येथून संपास सुरवात झाली. ज्यांनी संपाची हाक दिली, त्यांच्याशी चर्चा करण्यात गैर काय. अन्य कुणाला चर्चा करायची असेल तर आमची दारे खुली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सकारात्मक भूमिका घेतली, ती ज्यांना मान्य नव्हती त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. आणखी आठ दहा दिवस संप सुरू राहिला असता तर विरोधकांची राजकीय दुकाने सुरू राहिली असती. संप मिटल्यामुळे दुकाने बंद झाली; पण त्यामुळे शासनाने ठराविकांना हाताशी धरून संप मोडीत काढल्याचा आरोप होत आहे. संपकाळात कुणाच्या घरी साखरेची पोती सापडली. दंगाधोपा करणारे ही मंडळी कोण आहेत. 

हमीभावापेक्षा जो कमीभाव देईल, त्याच्यावर फौजदारी दाखल करणार, दुधाच्या वाढीव दराबाबत येत्या वीस जूनपर्यंत तोडगा काढणार, अल्पभूधारक शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार, असे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. ऐंशी टक्के कोरडवाहू शेतकऱ्यांचा प्रश्‍न यामुळे सुटेल, उर्वरित वीस टक्‍क्‍यांतही कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संपाबाबत शासन युद्धात जिंकले आणि तहात हरले, असे वक्तव्य केल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पवारांना शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्रिपदी असताना शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यासाठी पवारांचे कुणी हात बांधले होते का, आता बेछूट आरोप करत सुटलेत. अधूनमधून ते भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावर बोलतात. राज्यात धरणांची कामे अपूर्ण कामे का राहिली, धरणे न झाल्याने कालवे झाले नाहीत. अपुरे काम करण्यासाठी शासनाने नाबार्डकडून 24 हजार कोटींचे कर्ज काढले, असेही पाटील म्हणाले. 

उसाप्रमाणे दुधालाही हमीभाव देण्यासाठी प्रयत्नशील 
दूध नको असेल तर शाळांमध्ये मुलांना द्या, अन्य संस्थांना द्या; पण दूध रस्त्यावर का ओतता, असा सवाल करत पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे ऑगस्टमध्ये बॅलन्स शीट बघून उसाला एफआरपीप्रमाणे दर दिला जातो. त्याच धर्तीवर दुधालाही दर देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार सुरू आहे; पण नेमके विरोधकांना हे मान्य नाही. यामुळेच विरोधक टीका करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

Web Title: kolhapur news chandrakant patil congress farmer strike