डॉल्बीचा विरोधकही नाही, अन्‌ दुश्‍मनही नाही - पाटील

डॉल्बीचा विरोधकही नाही, अन्‌ दुश्‍मनही नाही - पाटील

डॉल्बी न लावणाऱ्या मंडळांनी घेतली निवासस्थानी भेट

कोल्हापूर - मी काही डॉल्बीच्या विरोधी नाही, दुश्‍मनही नाही अथवा कुणाच्या आनंदावर विरजणही घालायचे नाही. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनिप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास प्रसंगी पोलिसांवर गुन्हे दाखल होतील. त्यामुळेच डॉल्बीमुक्तीचा संकल्प सोडल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.

विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी न लावणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. 
ते म्हणाले, ‘‘डॉल्बी सोडून जी जी वाद्ये आणाल त्यास सहकार्य करण्याची भूमिका राहील. शहरातील शंभराहून अधिक तालीम संस्थांना बांधकामासह अन्य कामांसाठी मदत केली जाईल. मंडळाची जागा स्वतःची असेल तर अडचण नाही. मात्र जागा नसेल तर अडचणी निर्माण होतील. बांधकाम करणार असाल तर इमारतीची सकृतदर्शनी बाजू देखणी व्हायला हवी.

ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालय अधिक गंभीर आहे. न्यायमूर्ती ओक यांनी नुकतेच यासंबंधी ताशेरे ओढले आहेत. एक मुख्यमंत्री सोडले तर राज्य शासनातील कोणत्याही घटकाला न्यायालयाने सोडलेले नाही. ध्वनिप्रदूषण होऊनही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तर आयजीसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील. सरकार या नात्याने शेवटच्या शिपायाला संरक्षण देणे हे काम आहे. 

डॉल्बी लावू नका, यासाठी गेले आठवडाभर जेवढे प्रबोधन करता येईल तेवढे केले आहे. सत्तर ते ऐंशी टक्के मंडळे डॉल्बीच्या विरोधात आहेत. या मंडळांच्या आनंदावरही विरजण घालायचे नाही. त्यांना जे पारंपरिक वाद्य आणायचे आहे ते आणावे. त्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’

या वेळी तटाकडील तालीम मंडळ, हिंदवी, रंकाळावेश, उत्तरेश्‍वर वाघाची तालीम, बीजीएम, साई मित्र मंडळ, पी. एम. बॉईज, लक्ष्मीपुरी, रविवार पेठेतील पन्नासवर मंडळांनी मंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. वाघाच्या तालमीचे गणेश माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तालमीच्या बांधकामासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्याच (ता. १) काम सुरू करावे, अशी सूचना केली. बीजीएमचे भानुदास इंगवले, अमर माने यांनीही बांधकामाची गरज व्यक्त केली. 

डॉल्बीवरून सोशल मीडियावरून बदनामी सुरू आहे. त्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक विजय खाडे उपस्थित होते.

आयजीच्या जीवावर बायजी उदार नाही
उत्तरेश्‍वर वाघाच्या तालमीच्या कार्यकर्त्यांनी बांधकामासाठी मदतीची विनंती केल्यानंतर मी काही आयजीच्या जीवावर बायजी उदार नाही. आमदार पत्र देणार मग काम होणार, अशी माझी कार्यपद्धती नाही. त्यामुळे इमारतीचे काम उद्याच (ता. १) सुरू करा, मजुरी आणि मटेरियलची जबाबदारी माझी राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com