आंदोलन कसे करायचे आमच्याकडून शिका - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

विद्यार्थिदशेपासून चळवळीत आहे. यामुळे आंदोलने कशी करायची आम्हाला माहीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ७०ः३० चा कायदा केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. कारखाने सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे जिल्ह्यातील आठ कारखाने तोट्यात गेले. याचा विचार आंदोलकांनी करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

आजरा - विद्यार्थिदशेपासून चळवळीत आहे. यामुळे आंदोलने कशी करायची आम्हाला माहीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ७०ः३० चा कायदा केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. कारखाने सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे जिल्ह्यातील आठ कारखाने तोट्यात गेले. याचा विचार आंदोलकांनी करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गवसे (ता. आजरा) येथील आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर २१ व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. आमदार सुरेश हाळवणकर, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकून गळीत हंगामाला प्रारंभ झाला. काटा पूजन संचालक दिगंबर देसाई व त्यांच्या पत्नी शालन देसाई यांच्या हस्ते झाले.

अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, ‘‘गतवर्षी उतारा व गाळप कमी झाल्याने अडचणी वाढल्या; पण कारखान्याने कुणाचेही देणे ठेवले नाही. यंदाही कारखाना चालवण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. ’’

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘राजू शेट्टी आमचे परममित्र आहेत. आताच त्यांच्यात व आमच्यात मतभेद आहेत. मतभेद कायम टिकत नाहीत. वाहने अडवणे, टायर फोडणे यामुळे ऊस वाळतो. परिणामी, उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे नुकसान होते. ’’

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘बाजारात साखरेची किंमत काय मिळते याचे गणित नसते; पण कायद्यानुसार दर द्यावा लागतो. २० टक्के साखर खाण्यासाठी तर ८० टक्के उद्योगांसाठी वापरली जाते. उद्योगांसाठी दुहेरी दराचे धोरण घेतल्यास पाच हजार दर देऊ.’’

आमदार हाळवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मुकुंदराव देसाई, विष्णुपंत केसरकर, अंजनाताई रेडेकर, वसंतराव धुरे, सुनीता रेडेकर, प्रा. सुनील शिंत्रे, सुधीर देसाई, मलिककुमार बुरुड, जनार्दन टोपले, एम. के. देसाई, दशरथ अमृते, राजू सावंत, अरुण देसाई, उदयराज पवार, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, उद्योजक रमेश रेडेकर, सभापती रचना होलम, सर्व संचालक उपस्थित होते. उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी आभार मानले.

संघटनेबाबत धोरण
मुश्रीफ म्हणाले, ‘‘कारखानदार नसतानादेखील शेतकरी संघटनेबाबत जे धोरण होते, तेच आताही आहे. साखर दराबाबत भावनेचा अतिरेक झाल्याने अनेक कारखाने मोडीत निघाले. साखरेला दर मिळाला नाही तर देणार कुठून.’’

Web Title: Kolhapur News Chandrkant Patil Comment