'दारू'वरून कोल्हापूर महापालिकेत रणकंदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

या गदारोळातच सत्यजित कदम यांनी 'ठरावासाछी सुपारी फुटली आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी महालक्ष्मीला या क्षणीच जाऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करावे,' असे आव्हान दिले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी विरोधी आघाडीने लिकर लॉबीची सुपारी धेतल्याचा आरोप केला

कोल्हापूर - दारू दुकानांच्या ठरावावरून महापालिका सभेत अक्षरक्षः आज रणकंदन माजले. ठरावासाठी दोन कोटींची सुुपारी फुटल्याचा गंभीर आरोप सुनील कदम यांनी केला. तर ज्यांची दारू दुकाने सुरू आहेत त्यांची सुपारी विरोघी आघाडीने घेतल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. प्रचंड गदारोळ, गोंधळ, कानठळ्या बसविणारया आवाजात रस्ते हस्तांतरणाचा ठराव 47 विरोधी 32 मतांनी मंजूर झाला. 

कुणी सुपारी घेतली आणि कुणी नाही याची शहानिशा करण्यासाठी थेट महालक्ष्मीच्या दारात जाण्याचे आव्हान विरोधी आघाडीच्या सदस्यांनी दिला. "केवळ लाख रूपयात बाटली उभी राहिली. लाख नव्हे पन्नास हजारात! अरेरे, काही ही स्थिती!,' अशा आशयाचे टोमणेही या वेळी विरोधी पक्षाकडून सत्ताधारी सदस्यांना मारण्यात आले.

"राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाचा हस्तातंरणाचा विषय ही न्यायप्रविष्ट बाब आहे. आयआरबीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ठराव मतदानासाठी घेताच कसा,' अशी विचारणा करत भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभागृह अक्षरक्ष- डोक्‍यावर घेतले. सत्तारूढ कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य आणि विरोधी आघाडीत हातघाई झाली. सभाघ्यक्षा महापौर हसीना फरास यांच्या समोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न विलास वास्कर यांच्यासह अन्य सदस्यांनी केला. यावेळी सभागृहात इतका गोंधळ झाला, की महापौर या प्रकाराने भांबावून गेल्या.

जबरदस्तीने मानदंडाला हात घातल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांसह महिला सदस्याही चांगल्याच संतापल्या, दोन्ही आघाड्याचे सदस्यांच्या महापौरांच्या टेबलाभोवती जमा झाले. महापौरांनी हा ठराव बहुमतानी मंजूर झाल्याचे सांगताच विरोघी आघाडीच्या सदस्यांना पुन्हा संताप अनावर झाला. अखेर एकमत होत नसल्याने मतदानासाठी हा ठराव टाकण्याचा आदेश महापौरांनी दिला. विरोधी आघाडीचे सत्यजित कदम. विजय सुर्यवंशी, किरण नकाते, किरण शिराळे, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, संभाजी जाधव, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे यांनी मतदानास आक्षेप घेतला.

"ज्या रस्त्यांचे हस्तांतरण व्हायचे आहे. ते रस्ते आयआरबीच्या ताब्यात आहेत. सर्वोच्य न्यायालयात खटला सुरू आहे. हस्तांतरणास मंजुरी दिल्यास प्रकरण अंगलट येणार आहे,' असे विरोघी आघाडीचे मत होते. वकिलांना पाचारण करण्यात आले. वकील साळोखे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील दिल्लीत असल्याचे सांगितले. न्यायप्रविष्ट बाब असताना ठराव मतदानाला टाकताच कसा, असा जाब विरोधी आघाडीने नगरसचिवांनी विचारला. महापौर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यांनी मतदानाचे आदेश दिले. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात उंचावून सहमती दिली. विरोधी आघाडीचे सर्वच सदस्य उभे राहिले. 'दारूबंदी झालीच पाहिजे. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचा निषेध,' असा सूर त्यांनी लावला.

या गदारोळातच सत्यजित कदम यांनी 'ठरावासाछी सुपारी फुटली आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी महालक्ष्मीला या क्षणीच जाऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करावे,' असे आव्हान दिले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी विरोधी आघाडीने लिकर लॉबीची सुपारी धेतल्याचा आरोप केला. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. या गदारोळातच सदस्यांच्या सह्या घेण्याचे काम सुरू होते. ठरावाच्या बाजूने 47 आणि विरोधात 32 मतदान झाले. ठराव नामंजूर आणि उपसुचनेच्या बाजूने विरोधी आघाडीने मतदान केले. 

तत्पुर्वी प्रश्‍नोत्तराच्या तासात रस्ते हस्तांतरणावर चर्चा सुरू झाली. रूपाराणी निकम यांनी महिलांचा दारूच्या विरोधात रोष असताना ठराव मंजुरीचे धाडस करू नये असे सांगितले. भागातील विकासकामासाठी पैसे नाहीत आणि रस्त्यांची देखभाल दुरूस्ती कूठून करणार असा सवाल त्यांनी केली. महापौर आपण महिला आहात, ठराव मंजूर झाला तर महिलांचा अवमान होईल असेही त्यांनी नमूद केले. दिलीप पोवार यांनी पुण्यासह भाजपची सत्ता जेथे आहे तेथे ठराव मंजूर झाल्याचे सांगितले.

'जे रस्ते आपल्या ताब्यात नाहीत ते घेण्याचा का प्रकार आहे हा? कुणाच्या हितासाठी ठराव आणला गेला? कायद्याच्या कचाटयात अडकणार हे ध्यानात ठेवा. रस्ते ताब्यात घेतले तर बांधकाम परवान्याचे नियम बदलणार आहेत. नागरिकांना वेठीस का धरता?,' असा सवाल सुनील कदम यांनी केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कदम चढ्या आवाजात मत मांडत होते. शेवटी ते मुळ मूुद्दयावर आले आणि त्यांनी ठराव मंजुरीसाठी दोन कोटींची सुपारी फुटल्याचा खळबळजनक आरोप केला आणि सत्तारूढ आघाडीत आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.

पुरावे द्या आरोप करू नका असे सत्तारूढ सदस्य सांगत होते. शारंगधर देशमुख यांनी लिकर लॉबीची सुपारी विरोधी आघाडीने घेतल्याचा आरोप केल्याने गोंधळात आणखी भर पडली. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी असे म्हणणे त्यांनी मांडले. असा ठराव झालाच पाहिजे असा आग्रह विरोधी आघाडीने धरला. गोंधळामुळे महापौरांनी सभेचे कामकाज चालविणे कठीण झाले त्यांनी सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली

Web Title: Kolhapur News: Chaos in Kolhapur Municipal Corporation