कीड एक प्रकारची, औषध दुसरेच...

प्रमोद फरांदे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; कृषी आयुक्तांनी उचलली पावले

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; कृषी आयुक्तांनी उचलली पावले
कोल्हापूर - पिकांवर कीड एक प्रकारची; मात्र औषध दुसरेच देऊन बऱ्याचदा शेतकऱ्यांची विक्रेत्यांकडून आर्थिक फसवणूक होते. रोग, किडींवरील औषधांबाबतची पुरेशी माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने विक्रेते देतील ते औषध सर्रासपणे शेतकरी वापरतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे सुरू असलेली शेतकऱ्यांची ही फरफट थांबविण्यासाठी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना त्यांनी केल्याने हा विभाग सक्रिय झाला आहे.

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी, जास्त उत्पादनासाठी खते, औषधांचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापर करतात, मात्र याचे प्रमाण किती असावे, पिकांवरील किडीची प्राथमिक लक्षणे काय आहेत, ती कशी ओळखावीत, कोणती औषधे किती प्रमाणात वापरावीत या बाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी पुरेशी यंत्रणा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. कृषीच्या योजना राबविणारे कर्मचारीच शेतकऱ्यांना कीड, रोग, औषधे, खते यांची माहिती देत असतात. गेल्या दहा -पंधरा वर्षांपासून कृषी सहायकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पूर्णत: खत-औषधे विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागते.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर औषधे विक्रीसाठी बाजारात येत असतात. यासाठी या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे या कंपन्या वितरण तंत्राचा अवलंब करीत औषधे विक्रेत्यांना हाताशी धरतात. या कंपन्या विक्रेत्यांना मोठी प्रलोभने दाखवून औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. अनेकदा जमिनीतील पोषक घटकांचाही अभाव असतो. अशावेळीही रोग, कीडनाशक औषधे वापरली जातात. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वाढतो आणि अपेक्षित परिणामही होत नाही. शेतकऱ्यांची ही फसवणूक रोखण्यासाठी केंद्रेकर यांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
"शेतकऱ्यांना सर्व स्तरावर लुटले जात आहे. अशा वेळी आपण शेतकऱ्यांची मदत करायची नाहीतर कोणी करायची. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचवा आणि आपल्या परिसरातील कीड व रोगांबाबतची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा. त्यामुळे अनावश्‍यक औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जाणार नाहीत,' अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. विभागनिहाय बैठकीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणे कसे आवश्‍यक आहे, हे उदाहरणासह ते स्पष्ट करतात. व्हॉट्‌सऍपद्वारेही त्यांनी आढावा घेणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन त्या संदर्भात कारवाईमुळे केंद्रेकर काही अधिकाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ते आशेचा किरण ठरत आहेत.

Web Title: kolhapur news cheating to farmer by sailer