मंझील तो दूर है...पर हौसला बुलंद है...

राजेश मोरे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

अभ्यासूवृत्ती, चिकाटी आणि सहकाऱ्यांबद्दलची चांगली भावना हे गुण नाईक घाटगेंच्याकडे आहेत. दररोज पोलिस ठाण्यातील फलकावर त्यांच्याकडून लिहिलेले सुविचार पोलिस ठाण्यात चैतन्य निर्माण करतात.
- संजय साळुंखे, 
   पोलिस निरीक्षक, राजारामपुरी.

कोल्हापूर -  अभी तो मंझील दूर है, पर हौसला बुलंद असणाऱ्या पोलिस नाईक चेतन घाटगे यांची क्‍लास वन अधिकारी बनण्याची तयारी सुरू आहे. सेवा बजावताना बीए, एलएलबी, ‘सायबर लॉ’ची पदवी त्यांनी मिळवली. इतकेच नव्हे तर पोलिस ठाण्यातील फलकावर सुविचार लिहून सहकाऱ्यांत उत्साह, उमेद, सराकात्मक दृष्टिकोन तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 

नेज (ता. हातकणंगले) येथील चेतन यांचे सामान्य कुटुंब. वडील स्टॅंप रायटर. आई गृहिणी आणि छोटी बहीण. चेतन दहावीनंतर सायन्समधून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. एलएल.बी. करून स्पर्धा परीक्षा देऊन क्‍लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. शहाजी लॉ महाविद्यालयात त्यांनी एलएल.बी. पदवीचे शिक्षण सुरू केले. मुळातच ते ॲथलेटिक्‍सचे खेळाडू. त्यात ते राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले. ते २००७ मध्ये एलएल.बी.च्या पाचव्या वर्षात पोचले. त्याच काळात पोलिस भरती प्रक्रिया, तर दुसरीकडे महाविद्यालयातील ‘जीएस’ पदाची निवडणूक लागली.

वर्गप्रतिनिधी असल्याने घाटगेंना महत्त्व आले. निवडणुकीतून अंग काढून घेण्यासाठी त्यांनी पोलिस भरतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. क्रीडा प्रकारात आणि स्पर्धा परीक्षेत कोठे आहोत, हे जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. दोन्ही परीक्षांत ते जिल्ह्यात प्रथम आले. तोंडी परीक्षेत त्यांना शिक्षणाबद्दल विचारले गेले. ‘एलएल.बी.च्या शेवटच्या वर्षात’ हे उत्तर ऐकून परीक्षकांच्याही भुवया उंचवल्या. काही दिवसांनंतर परीक्षेत त्यांचा सहावा क्रमांक आला. 

पोलिस मुख्यालयात मुलाला बोलावल्याचे पत्र काही दिवसांनी वडिलांच्या हाती पडले. मुलगा वकील व्हायला गेला. त्यांनी चेतन यांना घरी बोलावून घेतले. पत्र वाचल्यानंतर पोलिस भरतीत निवड झाल्याचे समजले. वडिलांनी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घाटगे यांना दिले. त्यांनी प्राचार्य, प्राध्यापकांचा, मित्रांचा सल्ला घेतला. ‘घराला हातभार लावण्यासाठी नोकरीची गरज आहे.
नंतर एलएल.बी. आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण कर,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार घाटगे हे पोलिस दलात रुजू झाले.

प्रशिक्षणासाठी २००८ मध्ये ते मुंबईला गेले. त्याच वेळी त्यांच्या एलएल.बी.च्या शेवटच्या वर्षाची पहिल्या सत्राची परीक्षा होती. तब्बल १२ तासांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर घाटगे मध्यरात्रीपर्यंत जागून एलएल.बी.चा अभ्यास करू लागले. प्रश्‍न राहिला तो परीक्षेला सुटी मिळण्याचा. अनेक अधिकाऱ्यांकडे त्यांनी विनंती केली; मात्र पदरी निराशा पडली. अखेर घाटगे अपर पोलिस महासंचालकांकडे गेले. त्यांनी ९ दिवसांची सुटी मंजूर केली. त्यात त्यांना पाच विषयांचे पेपर देता आले. त्यात ते चार विषयांत यशस्वी झाले. दुसऱ्या सत्रात त्यांच्या अंगावर १४ विषयांचा बोजा पडला. त्याच वेळी लोकसभेची निवडणूक लागली. दिवसभर अभ्यास आणि रात्रीची ड्यूटी त्यांनी केली. दुसऱ्या सत्रात त्यांनी सर्व विषय सोडवत एलएल.बी. पूर्ण केले. त्यांनी ’सायबर-लॉ’ व मुक्त विद्यापीठात बी.ए.ची पदवी घेतली.

सुविचार लिहून सकारात्मक दृष्टिकोन
राजारामपुरी ठाण्यात सध्या ते कर्तव्य बजावत आहेत. हे पोलिस ठाणे स्मार्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. येथील फलकावर घाटगे दररोज मराठी, इंग्रजी सुविचार लिहतात. सहकाऱ्यांच्यात चैतन्य, उत्साह, सलोखा, सकारात्म दृष्टिकोनासह इंग्रजी भाषेची गोडी निर्माण व्हावी असा त्यांचा प्रयत्न गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. 

अभ्यासूवृत्ती, चिकाटी आणि सहकाऱ्यांबद्दलची चांगली भावना हे गुण नाईक घाटगेंच्याकडे आहेत. दररोज पोलिस ठाण्यातील फलकावर त्यांच्याकडून लिहिलेले सुविचार पोलिस ठाण्यात चैतन्य निर्माण करतात.
- संजय साळुंखे
   पोलिस निरीक्षक, राजारामपुरी.

Web Title: Kolhapur News Chetan Ghatge human interest story