गडहिंग्लजमधील सौद्यात जवारी मिरची 650 रूपये किलो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

गडहिंग्लज - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज झालेल्या मिरची सौद्यात जवारी मिरचीला किलोमागे 650 रूपयाचा दर मिळाला. या मिरचीची आवक कमी झाल्याने दर भडकल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी याच मिरचीला किलोमागे पाचशे रूपयाचा भाव मिळाला होता. 

गडहिंग्लज - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज झालेल्या मिरची सौद्यात जवारी मिरचीला किलोमागे 650 रूपयाचा दर मिळाला. या मिरचीची आवक कमी झाल्याने दर भडकल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी याच मिरचीला किलोमागे पाचशे रूपयाचा भाव मिळाला होता. 

बाजार समितीत बुधवार व शनिवारी मिरचीचा सौदा असतो. आज शिवानंद मुसळे यांच्या अडत दुकानात लिंगोंडा देसाई (हसूरवाडी) या उत्पादक शेतकऱ्याने आपली जवारी मिरची सौद्याला लावली. या वेळी झालेल्या सौद्यामध्ये जब्बार बागवान या व्यापाऱ्याने देसाईंची मिरची 650 रूपये किलोने खरेदी केली. या हंगामातील मिरचीला उच्चांकी दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सौद्यावेळी राजन जाधव, रोहित मांडेकर, भरतकुमार शहा, अमर मोर्ती, महेश मोर्ती, अरविंद आजरी, विश्‍वनाथ चोथे, बी. एस. पाटील, सलीम पटेल, श्रीकांत यरटे, संजय खोत, जावेद मुगळी, लक्ष्मण पाटील, राजू खोत, सुभाष चव्हाण, सौदा लिपीक विल्सन मिनिंजीस आदी उपस्थित होते. 

दरम्यान, येथील बाजार समितीत साधारणत: नोव्हेंबरपासून मिरचीची आवक सुरू होते. सुरूवातीला स्थानिक मिरचीची आवक होते. यामध्ये 70 ते 80 टक्के जवारी मिरचीचा समावेश होतो. आतापर्यंत मार्केट यार्डमध्ये 11 हजारावर मिरची पोत्यांची आवक झाली आहे. पंधरा दिवसापासून कर्नाटकातील ब्याडगी मिरचीची आवक सुरू झाली आहे. 

तालुक्‍यातील माद्याळ, भडगाव, जरळी, मुगळी, खमलेहट्टी, शिंदेवाडी, नूल, बसर्गे, दुंडगे, हसूरचंपू, निलजी, मुत्नाळ, हुनगिनहाळ आदी तर कर्नाटकातून नेर्ली, हत्तरवाट, आमणगी व आजरा तालुक्‍यातील बहिरेवाडी भागातून जवारी मिरची मोठ्या प्रमाणात येत असते. सध्या जवारी मिरचीचे उत्पादन कमी होवू लागल्याने त्याला चांगला दरही मिळत आहे. यापूर्वी जवारी मिरचीने पाचशे रूपयांवर किलोचा दर मिळविला होता. सरासरी दोनशे रूपयांच्या पुढेच या मिरचीला दर मिळतो. यंदा सुरूवातीला जवारी मिरचीची आवक चांगली असली तरी ती काहीशी डागी होती. 

"कॉम्बीनेशन"वर अधिक भर 
जवारी मिरची तिखट व चवीला असते. ब्याडगी मिरची रंगाला लालभडक असते. दरामुळे केवळ जवारी मिरची खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाही. यामुळे तिखट व चवीसाठी जवारी मिरची व लाल रंग येण्यासाठी ब्याडगी मिरची खरेदी करून कॉम्बीनेशनद्वारे पूड करण्याकडे या भागातील ग्राहकांचा कल असतो. 

Web Title: Kolhapur News Chili rate 650 rs.