‘जलसंपदा’ तोडणार कोल्हापूर शहराचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

कोल्हापूर - थकीत २१ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका आयुक्‍तांना जलसंपदा विभागाने अंतिम नोटीस बजावली आहे. ही थकबाकी न भरल्यास ५ मार्चपासून पाणी उपसा बंद केला जाईल. त्यामुळे होणाऱ्या परिणामांना महापालिका जबाबदार राहील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

कोल्हापूर - थकीत २१ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका आयुक्‍तांना जलसंपदा विभागाने अंतिम नोटीस बजावली आहे. ही थकबाकी न भरल्यास ५ मार्चपासून पाणी उपसा बंद केला जाईल. त्यामुळे होणाऱ्या परिणामांना महापालिका जबाबदार राहील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे चार ठिकाणांहून साधारणपणे शंभर ते दीडशे एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यासाठी जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. दर महिन्याला पाटबंधारे विभाग महापालिकेला पाणीपट्टीच्या देयकाची रक्‍कम पाठवत होते. मात्र, त्याकडे महापालिकेने लक्ष दिले नाही.

सध्या सर्वच विभागात मार्चअखेरची गडबड सुरू आहे. त्यामुळे वसुलीसाठी सर्वच शासकीय कार्यालयांची धावपळ सुरू आहे. महापालिकेकडे पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी यापूर्वी दोन नोटिसा जलसंपदा विभागाने पाठविल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या नोटीसवेळी महापालिकेने दीड कोटी रुपये भरले होते. राहिलेली थकबाकी भरण्याची सूचना त्या वेळी करण्यात आली होती; मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. 

त्यामुळे पुन्हा आज जलसंपदा विभागाने महापालिकेला थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. त्यात थकबाकी व चालू वर्षाचे बिल मिळून २१ कोटी ९४ लाख रुपये इतकी थकबाकीची रक्‍कम आहे. चालू २०१८ चे बिल २६ लाख ७१ हजार रुपये आहे. राहिलेली २१ कोटी ५३ लाख ४५ हजार रुपये २०१७ पर्यंतची थकबाकीची रक्‍कम आहे. या बिलात दंडाची रक्‍कमच पाच कोटी रुपये इतकी असून, थकीत विलंब आकाराची रक्‍कम तीन कोटी ७५ लाख ३९ हजार इतकी आहे. ही रक्‍कम ५ मार्चपर्यंत भरावी, अन्यथा पाणी उपसा बंद करण्यात येईल, असे महापालिकेला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Web Title: Kolhapur News city water supply issue