नाणी, पाच, दहाच्या नोटांचे गौडबंगाल काय?

शिवाजी यादव
शुक्रवार, 2 जून 2017

एसटीत नोटा बदलीचा आरोप - चौकशीचा पत्ता नाही 

एसटीत नोटा बदलीचा आरोप - चौकशीचा पत्ता नाही 

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलण्याची सुविधा बॅंकांमध्ये होती. त्यानुसार एसटी महामंडळात एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. त्याचा भरणा बॅंकेत केला जात होता. एसटीतून येणाऱ्या जुन्या नोटा बॅंका अधिकृतपणे स्वीकारत होत्या. त्याचाच लाभ उठवत काही आगारांत परस्पर नोटा बदलीचा उद्योग झाला आहे. यात संभाजीनगर आगारातून लाखो रुपयांच्या नोटा बदली झाल्याचा आरोप पतीत पावन संघटनेने केला; पण नोटाबंदीच्या काळात पाच, दहा, वीस रुपयांच्या नोटा व नाणी जमा होण्याची संख्या काही आगारांत अचानक घटली. याचाच अर्थ परस्पर नोटा बदलण्याचा उद्योग झाल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्येक आगारातील वाहकाला दहा, पाच व वीस रुपयांच्या नोटा तसेच नाण्यांचा हिशेब रोज लेखी द्यावा लागतो. त्यातून नोटा व नाण्यांची संख्या एसटीच्या रोखपालाकडे नोंदविली जाते. पुणे - कोल्हापूर एक फेरी झाल्यानंतर नेहमी वाहकाकडून सरासरी पन्नास-साठ नोटा जमा होत होत्या. नोटाबंदीनंतरच्या दीड-दोन महिन्यांत या नोटांची संख्या निम्म्याने खाली आली. अचानक सुटे पैसे येणे कमी कसे झाले, याचे उत्तर महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे कोणी मागितले नाही. महामंडळाने ते देण्याचा प्रश्‍नही आला नाही.

वाहक जेव्हा एका लाईनवरील प्रवास संपवून उतरतो, तेव्हा तो जमा झालेली रोकड आगारातील रोखपालाकडे देतो. रोखपालाकडून त्याचे तपशील नोंदविले जातात. तिथूनही पैसे बॅंकेत पाठविले जातात. पैसे भरताना त्याचे तपशील नोंदविले गेले आहेत. या नोंदीपूर्वीच वाहकांकडून आलेली रक्कम दोन, तीन तासांत बदलली गेली; मात्र त्यांच्या नोंदी चतुराईने टाळण्यात आल्या. त्यामुळे घडल्या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने पालकमंत्र्यांकडे केली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात याच संदर्भात एक बैठक बोलवली गेली. तेव्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी अर्धा तास एसटी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे नोटांच्या तपशीलाचा अहवाल दिला, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

या बैठकीच्या काही दिवस अगोदर विभाग नियंत्रकांनी नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या रकमेचा हिशेब जिल्हाधिकाऱ्यांना अगोदरच दाखविला असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. यातून विभाग नियंत्रकांनी माध्यमांची दिशाभूल केल्याचे दिसते. यावरून या नोटाबंदीच्या काळात नोटा परस्पर बदलल्या गेल्या असल्याचा संशय अधिक ठळक होतो. नोटाबंदीनंतर सर्व आर्थिक व्यवहार पूर्ववत झाले तरीही मुख्यालयाने या घटनेची दखल घेतलेली नाही. यातून बहुतेक अधिकारी एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उघड होत आहे.

कागदोपत्री ‘ओके’ 
नोटा बदलीप्रकरणी पतीत पावन संघटनेने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी निवेदन दिले; मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री सगळे ‘ओके’ असल्याचे दाखवले. कागदपत्रानुसार जरूर ते बरोबर असतील; पण या प्रकरणात संभाजीनगर डेपोतील नोटा बदलीवर चर्चा झाली. म्हणून इतर आगारांत काहीच झाले नाही का?, इथपासून ते नाण्यांची व अन्य नोटांची संख्या अचानक कमी कशी झाली, यावर कोणीच काही बोलत नाही, अशी स्थिती आहे.

Web Title: kolhapur news coin, five, ten currency issue