मार्गातले खडे...

विश्‍वनाथ पाटील
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

आपल्या मार्गात खडे तर असणारच. मार्गात पडून राहणे आणि चालणाऱ्याला भुरळ पाडणे हा तर त्यांचा स्वभावधर्म आहे. आपण त्या खड्यांकडे पाहायचे की नाही हे स्वत:च ठरवायचे. खडे दिसलेच तर त्यांच्या मोहाला बळी पडायचे की नाही हे आपल्याच हाती असते. आपण मार्ग चुकलो, तर त्याला मार्गातले खडे जबाबदार नसतात, तर त्या खड्यांच्या नादी लागण्याचा आपला मोह त्याला कारणीभूत असतो. मार्गात खडे येतच राहणार. त्यांना त्यांच्या जागी ठेवून आपल्या इच्छित ध्येयापर्यंत ठाम निश्‍चयाने जाणे म्हणजे यशस्वी होणे होय.

आपला मार्ग नक्की करून त्या मार्गावर ठामपणे चालत राहणे, ही यशस्वी होण्यासाठी मूलभूत बाब आहे. आपल्याला कुठे पोचायचे आहे हे एकदा पक्के झाले की, तिथपर्यंत जाण्याचा योग्य मार्ग कोणता हे ठरविणे सोपे जाते. ध्येय आणि मार्ग हे दोन्ही जेव्हा निश्‍चित असतात, तेव्हा यशस्वी होण्यासाठी मार्गावर टिकून राहणे एवढी एकच बाब सचोटीने पूर्ण करावी लागते.

माझ्या दररोजच्या वेळापत्रकात पाच ते सहा किलोमीटर चालणे याचा अंतर्भाव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अशाच एका दिवशी माझा रोजचा चालण्याचा व्यायाम मी सुरू केला. ठरलेल्या मार्गावरून चालत जाऊन एका ठराविक वेळेत जिथून निघालो तिथे परत पोचायचे, असा माझा शिरस्ता आहे. त्यानुसारच त्या दिवसाचे माझे चालणे सुरू होते. चालताना आजूबाजूला असणारी झाडे-झुडपे, पाने-फुले पाहत मी पुढे जात होतो. चालता चालता रस्त्यात माझे लक्ष एका गोष्टीकडे गेले. रस्त्यावर काही खडे पडले होते. त्यातलाच एक खडा पायाने टोलवायचा मोह मला झाला. मी लगेच त्याची अंमलबजावणी केली. टोलवलेला खडा थोड्या अंतरावर जाऊन पडला. तो जिथे पडला होता तिकडे मी वळलो. त्या खड्याजवळ जाऊन मी त्याला पुन्हा टोलवले.

आता खड्याला टोलवायचे, तो जिथे जाऊन पडेल त्या दिशेने जायचे आणि परत त्याला टोलवायचे यात मी पूर्णपणे गुंतून गेलो. असे करता करता टोलवलेला तो खडा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उघड्या चारीमध्ये जाऊन पडला. त्या खड्यामध्ये मी इतका गुंतलो होतो की, माझी पावले आपोआपच त्या चारीकडे वळाली. चारीमध्ये उतरून पुन्हा त्या खड्याला टोलवायचे या हेतूने मी चारीकडे गेलो. चारीमध्ये उतरणार तितक्‍यात मी भानावर आलो. आपण या रस्त्यावरून चालण्याचा व्यायाम करण्यासाठी आलो आहोत याची जाणीव झाली. रस्त्यावर पडलेला खडा हा आपल्या चालण्याचा भाग नाही हे ठळकपणे लक्षात आले. पण मग आपण आपला मार्ग सोडून या खड्याच्या नादी कसे काय लागलो? असा प्रश्‍नही पडला. माझ्या चालण्याच्या मार्गात असणारा हा खडा कोणत्याच क्रियाशीलतेशिवाय पडून होता. मी जाऊन त्याला टोलवावे, असे त्या खड्याने मला सांगितले नव्हते किंवा इतर कुणीही मला तसे म्हटले नव्हते.

मार्गात आलेल्या खड्याला टोलवायची इच्छा मुळात माझ्याच मनात अचानकपणे निर्माण झाली. त्या इच्छेने प्रबळ रूप धारण केल्यामुळे मी व्यायाम सोडून त्या खड्याच्या मागे लागलो. तो खडा जिकडे जाईल, तो माझा मार्ग बनला. शेवटी तर तो खडा बाजूच्या चारीमध्ये जाऊन पडला आणि मीही त्याच्या पाठोपाठ अगदी चारीमध्ये जायला तयार झालो. आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना असे अनेक खडे मार्गात पडलेले असतात. त्यातले काही अक्रियाशील असतात तर काही आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मार्गावर चालण्याचा आपला ठामपणा कमकुवत असेल, तर असे खडे आपल्याला भुरळ पाडतात. मग त्या खड्यांच्या मागे धावणे हाच आपला मार्ग बनतो. त्या मार्गावरून जाताना आपल्या यशाच्या मार्गावरून आपण कधी ढळलो हे आपल्याही लक्षात येत नाही. काही वेळा तर भलत्याच ठिकाणी पोहोचल्यावर आपण भानावर येतो. पण अशा वेळी कदाचित उशीरही झालेला असू शकतो. 

आपल्या मार्गात खडे तर असणारच. मार्गात पडून राहणे आणि चालणाऱ्याला भुरळ पाडणे हा तर त्यांचा स्वभावधर्म आहे. आपण त्या खड्यांकडे पाहायचे की नाही हे स्वत:च ठरवायचे. खडे दिसलेच तर त्यांच्या मोहाला बळी पडायचे की नाही हे आपल्याच हाती असते. आपण मार्ग चुकलो, तर त्याला मार्गातले खडे जबाबदार नसतात. तर त्या खड्यांच्या नादी लागण्याचा मोह त्याला कारणीभूत असतो. मार्गात खडे येतच राहणार. त्यांना त्यांच्या जागी ठेवून आपल्या इच्छित ध्येयापर्यंत ठाम निश्‍चयाने जाणे म्हणजे यशस्वी होणे होय.

Web Title: kolhapur news competitive exam supplement article

टॅग्स