कोल्हापूरकरांनी तहानलेलेच राहायचे का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कोल्हापूर - कोल्हापूरकरांनी तहानलेलेच राहायचे का? असा संतप्त सवाल करत सदस्यांनी महापालिका सभागृह दणाणून सोडले. पाण्याची गळती, चोरी आणि वितरण व्यवस्थेतील दोष यामुळे शहर पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असून, लोक पाणी पाणी करत आहेत, प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल करून प्रशासनाचे वाभाडे काढण्यात आले.

कोल्हापूर - कोल्हापूरकरांनी तहानलेलेच राहायचे का? असा संतप्त सवाल करत सदस्यांनी महापालिका सभागृह दणाणून सोडले. पाण्याची गळती, चोरी आणि वितरण व्यवस्थेतील दोष यामुळे शहर पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असून, लोक पाणी पाणी करत आहेत, प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल करून प्रशासनाचे वाभाडे काढण्यात आले.

कमलाकर भोपळे यांनी दूषित पाण्याच्या बाटल्याच थेट आयुक्तांसमोर ठेवल्या. लोक दोन-तीन महिने पाणी पितात आपण दोघांनी मिळून घोटभर तरी पाणी प्यावे, असे सांगून टेंबलाईवाडी परिसरातील दूषित पाण्याची दाहकता दाखवून दिली. तीन तासांच्या वादळी चर्चेनंतर पाईपलाईनची गळती काढण्यासाठी एक कोटी सात लाखांची कामे हाती घेणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली.

बालिंगा फिल्टर हाऊस, कसबा बावडा रायझिंग मेन, टाकीलगतची गळती,. टेंबलाई टाकीकडे नव्याने पाईपलाईन, नऊ नंबर शाळा राजारामपुरी येथील पाईपलाईन बदलणे अशी 
६३ लाखांची तातडीची कामे हाती घेतली जाणार आहेत. उर्वरित ४४ लाखांतून छोट्या-मोठ्या गळती काढल्या जातील. सर्व कामे एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले.

पाणीप्रश्‍न तसेच प्रलंबित विकासकामांवर चर्चेसाठी आजची विशेष सभा बोलावली. महापौरांची रजा असल्याने उपमहापौर सुनील पाटील यांच्या अध्यक्षततेखाली सभा झाली. ‘सकाळ’ने तीस एप्रिलच्या अंकात टुडेमध्ये कोल्हापूरच्या पाणीप्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. भूपाल शेटे यांनी ‘सकाळ’ चा अंक सभागृहात दाखवून पाण्याच्या गळतीचा प्रश्‍न किती गंभीर आहे, हे दाखवून दिले.

विजयसिंह खाडे यांनीही सोबत ‘सकाळ’ आणला होता. गटनेते शारंगधर देशमुख यांनी अंक पाहिला. त्याचा दाखला देत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. एक दिवसाआड पाणीपुरवठ्यास सदस्यांनी विरोध केला. नियोजनाला हात लावाल तर याद राखा, असा दम प्रशासनाला दिला. कमलकार भोपळे यांनी दूषित पाण्याच्या बाटल्याच सभागृहात सादर केल्या. यावर आयुक्तांनी, ‘‘अमृत योजनेतून नव्या लाईन टाकल्या की पाणीपुरवठ्यात सुरळीत होण्यास मदत होईल. अनधिकृत कनेक्‍शन शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊ, पाणीपट्टी बिलांचा नव्याने आढावा घेऊ’’ असे आश्‍वासन दिले. 

  •     गळती काढण्यासाठी एक कोटी सात लाख
  •     चार ठिकाणी गळतीची कामे तातडीने हाती घेणार
  •     गळतीचे काम एक महिन्यात पूर्ण करणार
  •     एक दिवसाआड पाणीपुरवठ्यास सदस्यांचा विरोध
  •     भोपळेची दूषित पाण्याच्या बाटल्यांची अधिकाऱ्यांना भेट
  •     प्रलंबित विकासकामांवरून सभा तहकूब
Web Title: Kolhapur News corporation special meeting on water issue