जयसिंगपूर न्यायालय जिल्ह्यात अव्वल 

गणेश शिंदे
बुधवार, 28 जून 2017

जयसिंगपूर - फौजदारी गुन्हे निकाली काढण्यात येथील प्रथमवर्ग न्यायालय जिल्ह्यात अव्वल ठरले. कमी वेळेत अधिकाधिक फौजदारी गुन्ह्यांचा निपटारा केल्याने येथील न्यायालयातील दोघा सरकारी वकिलांच्या कार्याला हा विशेष बहुमान मिळाला. विशेष सरकारी वकील आणि पोलिसांच्या समन्वयातून प्रथमवर्ग न्यायालयाने जिल्ह्यात लौकीक प्राप्त केला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनानेही कामगिरीबद्दल अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांच्या पाठीवर थाप मारली आहे. 

प्रथमवर्ग न्यायालयात जयसिंगपूर आणि शिरोळ ठाण्यातील फौजदारी गुन्ह्यांचा समावेश होतो. काही दिवसांपासून या दोन्ही ठाण्यांत किरकोळ स्वरूपाच्या लहानमोठ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे; मात्र पोलिस आणि सरकारी वकिलांच्या तत्परतेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल कमी कालावधीत होत आहे. 

सराफ दुकानात चोरीप्रकरणी पाच महिलांना तीन वर्षे सक्तमजुरी, पोलिसाला मारहाणप्रकरणी आरोपीला शिक्षा, बेदरकार वाहनचालकांमुळे हकनाक बळी गेल्याप्रकरणी वाहनधारकांना शिक्षा, हुंड्यासाठी विवाहितांचा छळ अशा गुन्ह्यांच्या शिक्षेच्या प्रमाणात जिल्ह्यातील अन्य न्यायालयांच्या तुलनेत वाढ झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ दोषारोपपत्र दाखल करण्याची तत्परता जयसिंगपूर पोलिसांनी दाखवली आहे. उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश सरवदे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी फौजदारी गुन्ह्यांमध्ये सरकार पक्षाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. 

विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे आणि रश्‍मी नरवाडकर यांनी समन्वयातून न्यायालयात गुन्हे नेमक्‍या स्वरूपात मांडून शिक्षेच्या प्रमाणात वाढ केली आहे. पोलिस नाईक एस. बी. भाट यांचेही योगदान आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने श्री. भाट यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्रही प्रदान केले आहे. 

फौजदारी गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून सहकार्य मिळते. खास करून साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात तत्परता दाखवली जाते. गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून बारकावे न्यायालयासमोर मांडत आरोपींना शिक्षेसाठी प्रयत्न केले आहेत. विविध प्रकारच्या फौजदारी गुन्ह्यांत अनेकांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांच्या प्रयत्नातूनच जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालय नंबर वन ठरल्याचा अभिमान वाटतो. 
- सूर्यकांत मिरजे, विशेष सहायक सरकारी वकील, जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालय. 

Web Title: kolhapur news court tops in district