सीपीआरचे ‘जीवनदायी’तून जीवनदान

शिवाजी यादव
गुरुवार, 13 जुलै 2017

दोन कोटी ७७ लाखांचा लाभ - एक हजार ४०० हून अधिक रुग्णांची प्रकृती तंदुरुस्त

दोन कोटी ७७ लाखांचा लाभ - एक हजार ४०० हून अधिक रुग्णांची प्रकृती तंदुरुस्त
कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात गेल्या दोन वर्षापूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ जेमतेम रुग्णांना मिळत होता याबद्दल लोक प्रतिनिधीपासून ते रूग्ण या सर्वांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. परिणामी सीपीआरमध्ये येणाऱ्या बहुतांशी रुग्णांना बदलेल्या महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचा लाभ लक्षणीय संख्येने मिळू लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास दोन कोटी ७७ लाख ५६ हजार रुपयांच्या उपचारांचा   १ हजार ४०० रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

सीपीआर रुग्णालयात दोन वर्षापूर्वीची स्थिती अशी की, गंभीर अवस्थतेतील जखमी अथवा आजारी व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला, मोठी शस्त्रक्रिया करावी लागली की, त्याला कांही मोजकी औषधे रुग्णालयात मिळत होती.

उर्वरीत औषधे खासगी औषध दुकानातून आणावी लागत होती. त्यामुळे तीनशे रुपयांपासून कांही हजार रुपयांची इंजेक्‍शन खासगी दुकानातून आणावी लागत होती. अनेकदा आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांना असा खर्च करणे परडवत नव्हते अशात रूग्णालयाला दोन कोटी रुपयांचा निधी येतो त्यातही सर्पदंश व श्‍वानदंशावरील लस घेण्यासाठी निम्मा अधिक खर्च होत होता.  पुरक औषधे घेण्यासाठी सीपीआरला शक्‍य होत नव्हते यातून अनेकदा औषधांची संख्या जेमतेम असल्याने इतर गंभीर अवस्थेतील रूग्णांसाठी ठरावीक कोटा शिल्लक ठेवावा लागत असल्याने कांही वेळा इतर साधारण रूग्णांना खासगीतून औषधे आणावी लागत होती.  राज्यातील बहुतेक शासकीय रूग्णालयातही हीच   स्थिती होती. 

गेल्या एप्रिल ते जून महिन्यात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित चालविण्यात येणाऱ्या रूग्णालयात औषधांचा साठा नसल्याने रूग्णांची गैरसोय झाली. याच काळात सीपीआर रूग्णालयात मात्र अशी अडचण आलेली नाही कारण सीपीआरमध्ये येणाऱ्या बहुतांशी गंभीर रूग्णांना योजनेत बसणाऱ्या आजारांचे निदान झाल्यास त्या- त्या योजनेचा लाभ देत उपचार केले जात आहेत. त्यामुळे रूग्णांवर विनाखर्च उपचार होत आहेत. गेल्या सहा महिन्यात जवळपास १ हजार ४०० रूग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात राज्यात सीपीआर सहाव्या क्रमांकावर आले आहे.  

महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना खासगी, शासकीय रूग्णालयात आहे. शासकीय रूग्णालयातील शस्त्रक्रिया व पुरक उपचार साधनसामुग्रीचा खर्च खासगी रूग्णालयांच्या तुलनेत कमी आहे. तर खासगी रूग्णालयात दर्जेदार उपचार जरूर आहेत पण तेथील उपचार पुरक साधनसामुग्री वापराचे स्वतंत्र दर आहेत, त्याचा बिलात समावेश होऊ शकतो. त्यातून रूग्णांवरील उपचाराचा एकूण खर्च विमा कंपनीला खासगी रूग्णालयाला द्याव लागतो. त्यातुलनेत शासकीय रूग्णालयात अनेक साधनसामुग्री शासकीय खर्चाची असल्याने कमी खर्चाचे बिल विमा कंपनीला शासकीय रूग्णालयाला द्यावी लागते. तेथे विमा कंपनीच्या खर्चाची बचत होऊ शकते. असेही योजनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

चिंताजनक रुग्णांचा वाचला जीव 
स्वाईन फ्लू सदृश रुग्ण चिंताजनक स्थितीत नुकताच सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. एक वेळी साडेसात हजार रुपयांचे एक इंजेक्‍शन संबंधित रुग्णाला पाच दिवस द्यावे लागले. यातून जवळपास ८५ हजार रुपये इंजेक्‍शनचा खर्च झाला. हा खर्च रुग्णाला परवडणार नव्हता. महात्मा फुले आरोग्यदायी जीवन योजनेतून त्या रुग्णाचा जीव वाचविण्‍यात आला.

Web Title: kolhapur news cpr life saving in jivandayi