क्रिकेट मैदानावरच हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

कोल्हापूर - त्याचे वय अवघे तेवीस वर्ष. एक महिन्यापूर्वी त्याचा धूमधडाक्‍यात विवाह झाला. जोडीदाराबरोबर सुखी संसाराची स्वप्ने तो रंगवत असतानाच नियतीने वेगळाच खेळ केला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जोडीदाराला सोडून कायमचा निघून गेला. ही करुण कहाणी आहे, विशाल मारुती भुई (बागडी) याची.

कोल्हापूर - त्याचे वय अवघे तेवीस वर्ष. एक महिन्यापूर्वी त्याचा धूमधडाक्‍यात विवाह झाला. जोडीदाराबरोबर सुखी संसाराची स्वप्ने तो रंगवत असतानाच नियतीने वेगळाच खेळ केला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जोडीदाराला सोडून कायमचा निघून गेला. ही करुण कहाणी आहे, विशाल मारुती भुई (बागडी) याची.

मणेर मळा, उचगाव येथे विशाल भुई हा पत्नी, आई-वडील आणि बहिणीसह राहत होता. वडिलोपार्जित घोंगडी विकण्याच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत तो नवीन काही तरी करू पाहत होता. शनिवारी (ता. २) सायंकाळी विशाल मित्रांबरोबर मुडशिंगी येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेला. मात्र, तो परत आलाच नाही. क्रिकेट खेळताना त्याला अचानक घाम सुटला. आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. अकबर नदाफ या मित्राला त्याची अस्वस्थता कळताच त्याने त्याला स्थानिक डॉक्‍टरांकडे नेले.

तिथून त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी विशालला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून, त्याला तातडीने महागडे इंजेक्‍शन देण्याची गरज असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मुलगा वाचेल या आशेने त्यांनी खर्चही केला, मात्र रात्री उशिरा डॉक्‍टरांनी विशालचा मृत्यू झाल्याचे सांगताच कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला. विशाल संसाराचा डाव अर्ध्यावरच सोडून गेल्याने त्याच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. विशालचा रक्षा विसर्जन विधी बुधवारी (ता. ६) होणार आहे.

स्वप्न विरले
एक महिन्यापूर्वी विशालचा विवाह झाला होता. घरातील एकुलता मुलगा असल्याने विवाह थाटामाटात करण्यात आला. विशाल आणि त्याची पत्नी नव्या आयुष्याची व सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागले होते. आज मात्र नियतीने त्याला हिरावून घेतले अन्‌ सुखाचे स्वप्न विरले.

Web Title: Kolhapur News cricketer dead on Ground