मलबारी-चौधरी गटात राडा 

मलबारी-चौधरी गटात राडा 

कोल्हापूर - लहान मुलांच्या चेष्टेतून आज दुपारी मलबारी व चौधरी गटात राडा झाला. यात चाकू व सत्तूरचा वापर करण्यात आला. हाणामारीत पाच जण जखमी झाले. खाटीक चौकात अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात आरडाओरड, पळापळीमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तेथेही दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याने तेथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. जाफर (वय 33) व याकूब मेहबूब चौधरी (31), इनाम नूर चौधरी (30), जाफर कादर मलबारी आणि हमजा कादर मलबारी (सर्व रा. इब्राहिम खाटीक चौक, सोमवार पेठ) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इब्राहिम खाटीक चौकात मलबारी व चौधरी कुटुंब राहते. गेल्या तीन दिवसांपासून इब्राहिम खाटीक चौकात शुभेच्छा फलक लावण्यावरून दोन गटांत वाद धुमसत होता. काल हा वाद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर मिटवण्यात आला. आज दुपारी रस्त्यावर लहान मुले चेष्टामस्करी करत होती. त्या मुलांना एका तरुणाने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाद झाला. याच वादातून दुपारी अडीच-तीनच्या सुमारास मलबारी व चौधरी गट समोरासमोर आले. सुरुवातीला वाद आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली. मारामारीत चौधरी गटाचे जाफर चौधरी, त्यांचा भाऊ याकूब, इनाम चौधरी हे तिघे गंभीर तर मलबारी गटाचे जाफर व हमजा कादर मलबारी हे दोघे जखमी झाले. गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने रस्त्यावरील नागरिकांची पळापळ झाली. त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. यातील दोन जखमींनी थेट लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने खाटीक चौकात धाव घेतली. तेथील जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. नागरिक व नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. तेथेही तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सीपीआरला भेट दिली. त्यांनी तेथे पोलिसांचा फौजफाटा मागवून घेतला. पोलिसांचे एक पथक बंदोबस्तासाठी खाटीक चौकात पाठवले. सीपीआरमध्ये माजी नगरसेवक जितेंद्र सलगर, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी यांनी गर्दी हटविण्यास पोलिसांना मदत केली. 

सायंकाळी जखमी जाफर चौधरीने दिलेल्या फिर्यादीनुसार जाफर कादर मलबारी, हमजा कादर मलबारी, मोहाज इकबाल थोडगे आणि अफताब मौलवी (सर्व रा. खाटीक चौक) यांच्यावर 307 अन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 

वाहतुकीची कोंडी 
रहदारीच्या खाटीक चौकात दुपारी अचानक झालेल्या हाणामारीमुळे परिसरात पळापळ होऊन तणाव निर्माण झाला. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ती हटविण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com