दोन खासगी सावकारांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर - विनापरवाना व्याजाने रक्कम देऊन वसुलीसाठी मारहाण आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या राजारामपुरी व सांगली येथील दोघा सावकारांविरोधात शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज गुन्हे दाखल झाले. बंटीशेठ पिंजाणी (रा. मेन रोड, राजारामपुरी १४ वी गल्ली) आणि नरेश अशोक परुळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर - विनापरवाना व्याजाने रक्कम देऊन वसुलीसाठी मारहाण आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या राजारामपुरी व सांगली येथील दोघा सावकारांविरोधात शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज गुन्हे दाखल झाले. बंटीशेठ पिंजाणी (रा. मेन रोड, राजारामपुरी १४ वी गल्ली) आणि नरेश अशोक परुळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खासगी सावकारांविरोधात कारवाईची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

श्री. सावंत यांनी दिलेली माहिती अशी, जयंत वसंत नेर्लेकर (वय ६१) नागाळा पार्क येथे राहतात. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची करण कन्स्ट्रक्‍शन कंपनी आहे. पाच बंगला, शाहूपुरी येथे कार्यालय आहे. त्यांनी २०१६ मध्ये म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील जोतिबा मंदिराच्या बांधकामाची निविदा भरली होती. त्यांना १२ लाखांचे काम मिळाले होते. ते त्यांनी सुरू केले. त्या वेळी त्यांना पैशाची गरज होती. त्यांची बंटीशेठ पिंजाणी याच्याशी ओळख होती. त्याच्याकडून त्यांनी ऑक्‍टोबर २०१६ मध्ये दोन लाख रुपये प्रतिमहिना ६ टक्के व्याजदराने घेतले होते. तारण म्हणून त्याने त्यांच्याकडून १०० रुपयांचा कोरा स्टॅंप, कोरे धनादेश घेतले होते. त्यानंतर नेर्लेकर यांनी ११ महिने प्रति महिना १२ हजार रुपयांसह वेळोवेळी एक लाख ५३ हजार रुपये दिले होते, तरीही पिंजाणीने रात्री-अपरात्री त्यांच्या घरासह कार्यालयात घुसून ‘७२ हजार रुपये दे,’ असा तगादा लावला होता. त्यासाठी तो मारहाण आणि ठार मारण्याची धमकीही देत असल्याची फिर्याद नेर्लेकर यांनी दिली. त्यानुसार पिंजाणी याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताराबाई रोड, साकोली कॉर्नर येथील सचिन आनंदराव वरुटे यांनी २०११ मध्ये घराच्या नूतनीकरणासाठी एक लाख रुपये कर्जाच्या मागणीचा अर्ज बॅंकेत दिला होता. कर्ज मिळाले नव्हते. दरम्यान त्यांच्या संपर्कात नरेश अशोक परुळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) आला. त्याने जून २०११ मध्ये त्यांना एक लाख रुपये प्रति महिना १० टक्के व्याजदराने दिले. त्या कर्जापोटी आतापर्यंत वरुटेंनी साडेचार लाख रुपये परुळेकर व त्याच्या नातेवाइकांच्या बॅंक खात्यावर जमा केले; तरीही तो ‘१ लाख ९० हजार रुपये दे,’ असा तगादा लावून ठार मारण्याची धमकी देत असल्याचे वरुटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परुळेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

खासगी सावकारांविरोधात नागरिकांनी निर्भीडपणे तक्रारी देण्यासाठी पुढे यावे. त्यांची नावे गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई केली जाईल. 
-तानाजी सावंत,
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

Web Title: Kolhapur News crime against Private lenders