आंबोली स्वर्ग; पण नको त्यासाठीच चर्चेत

सुधाकर काशीद
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडी, गोवा या चार ठिकाणांहूनही सगळ्यांना जवळच असं हे देखणं ठिकाण आहे; पण हे देखणं ठिकाण नको त्या गोष्टींसाठीच ‘प्रसिद्ध’ झाले आहे आणि ‘आपली मूळ आंबोली कशी होती’ या प्रश्‍नाने आंबोलीकरांनाच घेरून सोडले आहे. 

कोल्हापूर - पाऊस सगळीकडे आहे; पण दरीतून वाऱ्याच्या झोताबरोबर खालून वर उलटा येणारा पाऊस फक्त आंबोलीत. ओरडून घसा फुटला तरी आवाज तळापर्यंत पोचणार नाही, इतक्‍या खोल दऱ्या आंबोलीत आहेत... देशात कोठेही नाही, अशी वनसंपदा, सरपटणारे प्राणी आहेत... तब्बल १४० वर्षांपूर्वी म्हणजे सावंतवाडी संस्थान असल्यापासूनची दगडी बांधणीची शाळा आजही आंबोलीत आहे.

कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडी, गोवा या चार ठिकाणांहूनही सगळ्यांना जवळच असं हे देखणं ठिकाण आहे; पण हे देखणं ठिकाण नको त्या गोष्टींसाठीच ‘प्रसिद्ध’ झाले आहे आणि ‘आपली मूळ आंबोली कशी होती’ या प्रश्‍नाने आंबोलीकरांनाच घेरून सोडले आहे. 

आंबोली आज पर्यटनस्थळ, धांगडधिंगा आणि एखाद्याला दरीत लोटून देण्याचा परिसर म्हणून ओळखली जात असली तरी मूळ आंबोली हा घाट माथ्यावरचा एक स्वर्ग आहे. आता ती या वेगवेगळ्या कारणांनी प्रकाश झोतात असली, तरी माऊली देवीचं गाव अशी आंबोलीची ओळख आहे. आंबोली हे गाव आजूबाजूच्या आठ छोट्या वाड्यांचे मुख्य गाव आहे. कोल्हापूरच्या दिशेला आजऱ्याकडे व सावंतवाडीच्या दिशेला ‘पूर्वीचावस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वळणापर्यंत अशी १२ किलोमीटरची आंबोलीची हद्द आहे. 

गावात पूर्वी केवळ म्हणजे आठ छोट्या-छोट्या वाड्यांत मिळून २२५ घरे. पावसाळ्यात तीन महिने घरात शेकोटी करूनच सर्वांनी बसायचे इतका पाऊस आणि जोडीला गारठा. गावात ब्रिटिशकालीन चौथीपर्यंतच शाळा. रोजगार नाही. त्यामुळे पोरं जरा मोठी झाली, की बेळगावात हॉटेलात नोकरीला जायची आणि तेथेच पुढे मिलेट्रीत भरती व्हायची. त्यामुळे आंबोलीतली पोरं मिलेट्रीत हमखास असायचीच. 

कोल्हापुरातून सावंतवाडीला जायचा ब्रिटिशकालीन रस्ता आंबोलीतूनच. त्यामुळेच काय ती वाहनांची येथे वर्दळ होती. आज जो प्रसिद्ध आणि गर्दीने ओसंडून वाहणारा धबधबा आहे. त्याचे मूळ नाव हागऱ्याचा नाला. येथे ट्रकवाले थांबायचे. आंघोळ पाणी आटोपून पुढे जायचे. आता जो कावळेसाद पॉईंट आहे, ती गेल्याची वाडी. येथे फक्त गिधाडांचे वास्तव्य असायचे. माऊलीच्या यात्रेतच रात्री सावंतवाडीहून गॅसबत्या आणल्या जायच्या. त्यामुळे त्या यात्रेच्या काळातच रात्री आंबोलीत झगमगाट दिसायचा. बाकी इतरवेळी दिवस मावळला, की दुसऱ्या दिवसापर्यंत अंधारच होता. सारे गाव केवळ भातशेतीवर जगायचे. 

धांगडधिंगा ही नवी ओळख
साधारण १९७५-८० च्या दरम्यान आंबोलीकडे पर्यटन म्हणून बघायला सुरुवात झाली. पीडब्ल्यूडीने १२ खोल्यांचे रेस्ट हाऊस बांधले; पण तेथे वर्षाला दहा ते बाराच पर्यटक राहात होते. जे राहायला यायचे ते मुंबईहून कोकणात आलेलेच असायचे. पुढे ‘एमटीडीसी’कडे हे रेस्ट हाऊस गेले. आज साधारण १५० लोकांची आंबोलीत राहण्याची सोय आहे. बार आहेत. ‘हागरा नाला’ नाव असलेला धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. धांगडधिंगा, आरडाओरड, मौजमजा मस्ती, मद्यपान, भरधाव वेगाने वाहने ही नवी ओळख झाली आहे. 

उत्साहामुळे स्थळाची वाट
आंबोलीला देशातले वेगळे दुर्मीळ गतवैभव आहे, हेच पर्यटक विसरला आहे. इथल्या दऱ्यात मृतदेह ढकलले जात आहेत. सांगली पोलिसांतील काही मग्रूर पोलिसांनी तर येथे एका आरोपीला जाळून आपली ‘कामगिरी’ दाखवली. त्यापूर्वी दोघा मद्यपींनी उपस्थित शेकडो पर्यटकांच्या डोळ्यांदेखत इथल्या दरीत जीवन संपवले आहे. आता आंबोलीची ही अवस्था बदलण्यासाठी हालचाली सुरू आहेत. प्रत्येकाची पोलिस तपासणी होणार आहे. सायंकाळी पर्यटकांना आंबोलीत फिरण्यावर बंदी आणली; पण यामुळे आंबोलीची बदनामीच अधिक झाली. एखाद्या पर्यटनस्थळाची अतिउत्साही पर्यटक कशी वाट लावतात, याचे आंबोली हे ताजे उदाहरण ठरले.

Web Title: Kolhapur News crime in Amboli region issue