एकतर्फी प्रेमातून आझाद गल्लीत तलवार हल्ला

एकतर्फी प्रेमातून आझाद गल्लीत तलवार हल्ला

कोल्हापूर - एकतर्फी प्रेमातून तरुणाने युवतीच्या घरात घुसून तलवार हल्ला केल्याचा प्रकार काल सायंकाळी आझाद गल्ली येथे घडला. हल्ल्यात दोघे जखमी झाले असून, त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.  सायंकाळी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अमोल गावडेसह आणखी तिघांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला. सुरेश बळवंत काकडे (वय ५५, रा. आझाद गल्ली) आणि त्यांचे जावई योगेश बाबासाहेब घोसरवाडे (३५, रा. हळदी कांडगाव, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. काकडे हिंदू एकताचे कार्यकर्ते आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आझाद गल्लीत सुरेश काकडे कुटुंबासोबत राहतात. त्यांची खानावळ आणि कापड व्यवसाय आहे. त्यांच्या दोनपैकी एका मुलीचा विवाह झाला आहे. दुसरी मुलगी महाविद्यालयात जाते. लक्ष्मीपुरी परिसरात राहणारा अमोल गावडे याने एकतर्फी प्रेमातून काकडे यांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी लग्नासाठी मागणी घातली होती. याबाबत दोन्ही कुटुंबांत चर्चाही झाली होती; पण काकडे यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे तो संतप्त झाला होता. आज सकाळी काकडे यांची मुलगी नोकरीसाठी जात होती. त्या वेळी तिला आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात अडवून अमोलने मारहाण केली. त्यानंतर तिला रिक्षात घालून पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.  याबाबत काकडे परिवाराने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

याच रागातून सायंकाळी पाचच्या सुमारास अमोल तीन मोटारसायकलवरून गौरव वडेर, प्रवीण खाडे यांच्यासह ८ ते ९ साथीदारांसह आझाद गल्लीत आला. त्यांच्या हातात तलवारी होत्या. काकडे यांच्या घरात अमोल घुसला. त्याचे साथीदार बाहेर थांबले. अमोलने लग्नास नकार दिल्याच्या रागातून काकडे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यांच्या डोक्‍यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याला रोखण्यासाठी काकडे यांचे जावई योगेश घोसरवाडे पुढे आले. त्यांच्यावरही अमोलने हल्ला केला. अमोलने त्यांच्याही डोक्‍यावर वार केला. त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले. हल्ल्याचा प्रकार पाहून काकडे यांची पत्नी व मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. ते पाहताच हल्लेखोर पळून गेले. यानंतर काकडे यांच्या भावजयने नागरिकांच्या मदतीने दोघांना रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. 

हा प्रकार समजल्यानंतर परिसरातील नागरिक व नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे जुना राजवाडा पोलिस दाखल झाले. जखमींवर उपचार सुरू होते. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते. पोलिसांचे पथक अमोल व त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहे.

धमकीचा फोन...
जखमींवर उपचार सुरू असतानाच मुलीच्या मोबाईलवर पुन्हा गावडेचा फोन आला. त्याने तिला धमकी दिल्याची चर्चा होती. काही नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांना दिली. 

अमोल आरसी ग्रुपचा?
हल्लेखोर अमोल गावडे जवाहरनगरातील आरसी ग्रुपशी संबंधित आहे. त्याची महाविद्यालयातही दहशत होती, अशी चर्चा होती. याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. 

वेळीच दखल का घेतली नाही?
सकाळी मुलीला झालेल्या मारहाणीनंतर राजारामपुरी पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर सायंकाळचा प्रकार घडला नसता, अशा संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांकडून उमटत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com