चारूविरुद्ध ठोस परिस्थितिजन्य पुरावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - देवकर पाणंद येथील दर्शन शहा खून खटल्यातील संशयित योगेश ऊर्फ चारू चांदणे याच्याविरोधात ठोस परिस्थितिजन्य पुरावे असल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादात केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे 24 निवाडेही सादर केले. पुढील सुनावणी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी उद्या (ता. 24) ठेवली आहे. 

कोल्हापूर - देवकर पाणंद येथील दर्शन शहा खून खटल्यातील संशयित योगेश ऊर्फ चारू चांदणे याच्याविरोधात ठोस परिस्थितिजन्य पुरावे असल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादात केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे 24 निवाडेही सादर केले. पुढील सुनावणी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी उद्या (ता. 24) ठेवली आहे. 

देवकर पाणंद येथील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खूनप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणेवर गुन्हा दाखल झाला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. आजच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 24 निवाडे युक्तिवादात मांडले. हा खटला परिस्थितिजन्य पुराव्यावर आधारित आहे. अशा पुराव्यांची साखळी आहे. चारूबरोबर दर्शनला जाताना शेवटेच पाहणारे साक्षीदार आहेत. याबाबत चारूने खुलासा केलेला नाही. तो सत्य लपवत आहे. कारण त्याने गुन्हा केलेला आहे, असा त्याचा अर्थ काढावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सांगतात. परिस्थितिजन्य पुरावे खोटे आहेत म्हणून चालणार नाही. बचाव पक्षाने मिळालेल्या या संधीचा वापर करून खुलासा करायला हवा; पण तो त्यांच्याकडून केला जात नाही. हादेखील परिस्थितिजन्य पुरावा होऊ शकतो. चारूने शेतातील ज्या ठिकाणाहून नॉयलॉन दोरी व रुमाल काढून दिला, ती जागा खुली असली तरी इतरांना माहिती होणार नाही, अशी आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही ती जागा दिसत नाही. यावरून चारूने हा गुन्हा केल्याकडे ऍड. निकम यांनी युक्तिवादात लक्ष वेधले. 

संशयित चारूची बाजू मांडताना त्यांचे वकील पीटर बारदेस्कर यांनी गुन्ह्याची वेळ साक्षीदारांना सांगता येत नाही. त्यात विसंगती आहे. आरोपपत्रात गुन्ह्याची वेळ निश्‍चित नोंदवलेली नाही. पुरावा म्हणून सापडलेली धमकीची चिठ्ठी सील केलेली नाही. साक्षीदारांनी दिलेल्या जवाबानुसार चिठ्ठी व लखोट्याबाबत विसंगती आढळते. ती चिठ्ठी या गुन्ह्यात तपास यंत्रणेकडून घुसडण्याचा प्रयत्न केला असल्याचा युक्तिवाद केला. आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. उद्या (ता. 24) च्या सुनावणीत पुन्हा ते बाजू मांडणार आहेत. या वेळी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक यशवंत केडगे, दर्शनची आई स्मिता शहा उपस्थित होते.

Web Title: kolhapur news crime darshan shah murder case