गडहिंग्लजमधील 13 जणांवर तडिपारीचा प्रस्ताव अधीक्षकांकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

गडहिंग्लज - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लज शहर व तालुक्‍यातील तेराजणांच्या तडिपारीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी आज दिली. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास कुरणे उपस्थित होते. 

गडहिंग्लज - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लज शहर व तालुक्‍यातील तेराजणांच्या तडिपारीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी आज दिली. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास कुरणे उपस्थित होते. 

श्री. हसबनीस म्हणाले, ""वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व मागील गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी असलेल्या 15 जणांच्या तडिपारीची यादी तयार केली आहे. यांतील तेरा जणांचे प्रस्ताव तडिपारीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित दोघांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीसाठी संबंधित गुन्हेगारांना तडिपार करण्यात येईल. गणेशोत्सव मंडळांनी कायदा व सुव्यवस्था पाळून गणेशोत्सव साजरा करावा. मंडळांची नोंदणी असेल, तरच गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाईल. प्रत्येक मंडळाने रोजच्या स्वयंसेवकांची यादी पोलिस ठाण्याला सादर करावी. गणेशोत्सव मंडपासमोर स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मंडळांनी व्यवस्था करावी. रात्री बारानंतर ध्वनिक्षेपकाचा आवाज बंद करावा. डॉल्बीसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेले आदेश येथेही लागू राहतील. डी.जे. मालकांचीही लवकरच बैठक घेतली जाईल.'' 

या बैठकीनंतर लगेचच शहरातील वाहतूक प्रश्‍नाविषयी चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी सूचना मांडल्या. माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, रामकुमार सावंत, प्रा. पी. डी. पाटील यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, उदय कदम, बसवराज आजरी, चंद्रकांत सावंत, जे. बी. बारदेस्कर, नागेश चौगुले, शैलेंद्र कावणेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

लोडिंग-अनलोडिंगवर निर्बंध 
हसबनीस म्हणाले, ""शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न जटिल आहे. पहिल्या टप्प्यात आठवडा बाजारादिवशी वाहतुकीची शिस्त लावली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत अवजड वाहनांमध्ये मालभरणी व उतरवून घेण्यास निर्बंध राहील. रात्री आठ ते सकाळी नऊपर्यंत संबंधितांनी हे काम करून घ्यावयाचे आहे. त्याची अंमलबजावणी 10 सप्टेंबरपासून केली जाईल. यासाठी व्यापाऱ्यांचीही स्वतंत्र बैठक घेणार आहे.''

Web Title: kolhapur news crime Police Inspector Gadhinglj