शिराळे, साठे, पेडणेकरसह दहा खासगी सावकारांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

कोल्हापूर - प्रफुल्ल शिराळे, मदन साठे, विजय पेडणेकर यांच्यासह दहा खासगी सावकारांवर आज करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ते दहा टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही दमदाटी करून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूर - प्रफुल्ल शिराळे, मदन साठे, विजय पेडणेकर यांच्यासह दहा खासगी सावकारांवर आज करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ते दहा टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही दमदाटी करून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद सराफ बाबासो बाबू पडवळ (वय ४२, पडळवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपी प्रफुल्ल शिराळे (कोष्टी गल्ली, शुक्रवार पेठ), मदन साठे (संध्यामठ गल्ली), जयकुमार बाबासाहेब पाटील (हालोंडी, ता. हातकणंगले), संजय वसंतराव कारेकर (लक्ष्मी गल्ली, महाद्वार रोड), शकुंतला विलास नाईक (शुक्रवार पेठ), विजय रामचंद्र पेडणेकर (शाहू बॅंकेजवळ, मंगळवार पेठ), अनिकेत जयसिंग तोडकर (उत्तरेश्‍वर पेठ), सुनीता आनंदराव आडूरकर (कोकाटे गल्ली, बुधवार पेठ), चंद्रकांत पुंडलिक सोनवणे (रविवार पेठ), तिरमित गवळी (राजेंद्रनगर) या सर्वांनी वेळोवेळी फिर्यादीस पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाने पैसे दिले. सन २०१४ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत वेळोवेळी पडवळवाडी (ता. करवीर) येथे फिर्यादीच्या राहत्या घरी हे पैसे देण्यात आले.

सन २०१४ ते डिसेंबर २०१७ दरम्यान वेळोवेळी फिर्यादीच्या घरी संशयित आरोपी यांचेकडून तीन वर्षांत देणे भागविण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते. त्यापोटी फिर्यादी पडवळ यांनी आरोपी यांचेकडून घेतलेल्या पैशांपेक्षा जादा पैसे दिले आहेत. तरीही संशयित दहा आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी पडवळ यांच्याकडे व्याज आणि मुद्दलची मागणी केली. फिर्यादीच्या घरी जाऊन वेळोवेळी त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून ठार मारण्याची व मिळकत काढून घेण्याची धमकी दिली. या वारंवार होणाऱ्या त्रासातून कंटाळून पडवळ यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित सर्व संशयित आरोपींना ठाण्यात बोलविले आहे. त्यांच्याकडून खातरजमा करून अधिक माहिती घेतली जाईल. दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामाही केला जाणार असल्याचे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल प्रशांत माने यांनी ‘सकाळी’शी बोलताना सांगितले.

Web Title: Kolhapur News Crime on private lenders