रुकडी परिसरात संचारबंदी लागू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

रुकडी - कोरेगाव भिमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रुकडी (ता. हातकणंगले ) येथील दलित बांधवांनी पुकारलेल्या ' रुकडी बंद 'ला कालपासून हिंसक वळण लागल्याने रुकडी परिसरात 72 तासांचा संचार बंदीचा आदेश लागू आहे

रुकडी - कोरेगाव भिमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रुकडी (ता. हातकणंगले ) येथील दलित बांधवांनी पुकारलेल्या ' रुकडी बंद 'ला कालपासून हिंसक वळण लागल्याने रुकडी परिसरात 72 तासांचा संचार बंदीचा आदेश लागू आहे.

बुधवार (ता. 3) दिवसभर रुकडी बंद होती. कोल्हापूर येथील शिवसेना व हिंदू संघटनांनी प्रतिमोर्चे काढल्याने त्याचे पडसाद पुन्हा उमटले. यावेळी दलित कार्यकर्त्यांनी पुन्हा निषेध मोर्चा काढला यावेळी काही समाजकंटकांनी डिजीटल फलक फाडल्याने वातावरण चिघळले. हिंदुत्ववादी संघटना व दलित समाजातील लोकांच्यात जोरदार दगडफेक झाली. हातकणंगलेचे पोलीस निरिक्षक सी. बी. भालके यांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलीसांची मोठी कुमक मागविली तोपर्यंत खाद्य पदार्थांच्या गाड्या, दोन चाकी, चार चाकी गाड्या व दुकाने फोडण्याचे तसेच जाळपोळीचे प्रकार झाले. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी रात्रभर जमावबंदी करण्यात आली होती. 

दरम्यान, आज सकाळी पुन्हा दोन्ही गटाच्या जमावांना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिनेश बारी, डी वाय एस पी कृष्णात पिंगळे व विनायक नरळे, पोलीस निरीक्षक भालके, पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी शांतता बैठक घेवून समजवण्याचा प्रयत्न केला मात्र सकाळी 11 च्या सुमारास दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याने वातावरण पुन्हा चिघळले. प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसिलदार वैशाली राजमाने यांनी 72 तासांची संचारबंदीचे आदेश लागू केले. सायंकाळपर्यंत गावातून पोलिसांनी संचलन केले. यावेळी दिवसभरात 40ते 50 युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सकाळी झालेल्या या दगडफेकीच्या दंगलीत अनेक नागरीक जखमी झाले असून पोलीस निरिक्षक यशवंत गवारी, प्रकाश कांबळे, वैभव पाटील, आनंदा कदम यांच्यासह पोलीस गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गावात पोलीस छावणीचे स्वरूप आले असून अप्पर पोलीस अधिक्षक डॉ बारी, डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, विनायक नरळे यांच्यासह दंगल काबू पथक, जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस दल तैनात आहे

Web Title: Kolhapur News curfew in Rukadi