सायबर सेलकडून सहा महिन्यांत बाराशेहून अधिक गुन्ह्यांची उकल

भूषण पाटील
बुधवार, 6 जून 2018

कोल्हापूर - खून, मारहाण करणाऱ्यासह बेपत्ता व्यक्तीचा शोध, चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे, अपघाती मृताची ओळख पटविणे अशा बाराशेहून अधिक गुन्ह्यांत सायबर सेलचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पोलिस मुख्यालयातील सायबर पोलिस ठाणे जिल्हा पोलिस दलाच्या मदतीला धावले. या मदतीमुळे गेल्या सहा महिन्यांत गुन्ह्यांची उकल वाढली आहे. 

सोशल मीडिया तसेच ऑनलाईन व्यवहाराच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबर इंटरनेट बॅंकिंगद्वारे होणारी फसवणूक, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सअप आदी सोशल मीडियातून होणारे गैरप्रकार आणि ब्लॅकमेलिंग यांचे प्रमाणही वाढले आहे. सामान्य गुन्ह्याच्या तपास पद्धतीने सायबर गुन्ह्याचा तपास करणे शक्‍य नसते. त्यामुळे अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार गृह विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक सायबर पोलिस ठाणे सुरू झाले. यातील आधुनिक सॉफ्टवेअर आणि तांत्रिक मदतीने सायबर गुन्हे उघडकीस आणले जातात. सायबर गुन्ह्याबरोबरच आता सामान्य गुन्ह्याच्या तपासातही सायबर विभागाची मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे. 

अशी आहे पद्धत 
ऑनलाईन फसवणूक अगर सोशल मीडियाचा वापर करून एखादा गुन्हा झाल्यास तक्रारदार संबंधित पोलिस ठाण्यात जातो. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सायबर पोलिस ठाण्यात येऊन तपासात तांत्रिक मदत घेतात. तक्रारदार स्वतः सायबर पोलिस ठाण्यात गेल्यास त्याची तक्रार ऐकून घेऊन अनौपचारिक मदत केली जाते. मात्र, अधिकृतरीत्या कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्याला कळवले जाते. वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते.

जानेवारी २०१८ पासून उघडकीस आलेले गुन्हे 

  • खून, मारामाऱ्या- ७३०
  • बेपत्ता व्यक्तींचा शोध- २२७
  • सोशल मीडियाचा वापर करून केलेले गुन्हे- १३८
  • आकस्मिक मृत व्यक्तींचा शोध- १८ 
  • गहाळ मोबाईल- १५१
Web Title: Kolhapur News Cyber cell solve 1200 crime in six months