कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय मंजुरीच्या प्रतीक्षेत - डी. कणकरत्नम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याआधारे आवश्‍यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ निर्माण होईल आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होईल, असे मत राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. कणकरत्नम यांनी आज येथे व्यक्त केले.

कोल्हापूर - जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय व्हावे, याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच पोलिस प्रशासनाने पाठविला आहे. शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याआधारे आवश्‍यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ निर्माण होईल आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होईल, असे मत राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. कणकरत्नम यांनी आज येथे व्यक्त केले. जुना राजावडा पोलिस ठाण्याच्या तपासणीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १९९२ मध्ये अपर पोलिस अधीक्षक म्हणून मी काम केले आहे. त्यावेळी लोकसंख्या कमी होती. ठाण्यांचीही संख्या कमी होती. फक्त एकच अपर पोलिस अधीक्षक आणि तीन उपअधीक्षक होते. आज हे चित्र बदललेले आहे. अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांसह ठाण्यांचीही संख्या वाढली आहे. गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करून येथे पोलिस आयुक्तालय सुरू करावे, अशी मागणीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. तो मंजूर झाल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी, आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील.’’

ते म्हणाले, ‘‘पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील पोलिस ठाण्यांची तपासणी अरितिक्त पोलिस महासंचालकांकडून केली जाते. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या तपासणीचे काम माझ्यावर सोपविण्यात आले आहे. शनिवारपर्यंत तपासणी सुरू राहणार आहे. सकाळी इचलकरंजीतील पोलिस ठाण्यांची तपासणी केली. तेथील सुविधा, गुन्ह्यांचे प्रमाण, गुन्हे उकल करण्याचे प्रमाणासह, प्रशासकीय कामकाजाची तपासणी केली. सायंकाळपासून जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या तपासणीचे काम सुरू आहे. आवश्‍यक सुविधेबाबतची माहिती घेतली जात आहे. कायदा सुव्यवस्थेच्यावेळी बाहेरून येणाऱ्या बंदोबस्तासाठी पोलिस भवनाबाबतची गरज असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडून प्राप्त होईल. त्यावर निश्‍चित विचार केला जाईल.’’ 

ते म्हणाले, ‘‘गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातील परिस्थिती नियंत्रणात असून सुधारत आहेत. येथे चार अपर पोलिस अधीक्षकांसह ५०० पोलिस कर्मचारी काम करत आहेत. येथे कर्तव्य बजावण्यासाठी यापूर्वी कोणी पुढे येत नव्हते; मात्र आता ती परिस्थिती बदललेली आहे. तरुण पोलिस अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर गडचिरोलीत कर्तव्य बजावण्यासाठी पुढे येत आहेत. ही अत्यंत चांगली बाब म्हणावी लागेल.’’
या वेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, उपअधीक्षक डॉ. सई भोरे-पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News D Kankratnam comment