"युवाशक्ती' ची तीन लाखांची दहीहंडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - "धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने बुधवारी (ता. 16) दसरा चौकात दहीहंडीचा थरार होणार आहे. या दहीहंडीसाठी यावर्षी तीन लाख रुपयांचे बक्षीस असून महिला संघांनाही या स्पर्धेत उतरण्याची संधी दिली जाणार आहे. महिला संघांना प्रोत्साहनपर 25 हजार रुपये बक्षीस दिले जाईल,' अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - "धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने बुधवारी (ता. 16) दसरा चौकात दहीहंडीचा थरार होणार आहे. या दहीहंडीसाठी यावर्षी तीन लाख रुपयांचे बक्षीस असून महिला संघांनाही या स्पर्धेत उतरण्याची संधी दिली जाणार आहे. महिला संघांना प्रोत्साहनपर 25 हजार रुपये बक्षीस दिले जाईल,' अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. महाडिक म्हणाले, ""गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीचा कार्यक्रम झाला नाही. यावर्षी न्यायालयाने दिलेला निर्णय अपेक्षित होता. राज्य सरकारनेही आता याला परवानगी दिली आहे, तशी चर्चा झाली आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भातील शासन आदेश येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार 14 वर्षांखालील खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत सहभागी करून घेतले जाणार नाही.'' 

ते म्हणाले, ""ऐतिहासिक दसरा चौकात हा थरार बुधवारी सायंकाळी चार वाजता होईल. विजेत्या संघाला माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून रोख तीन लाख रुपये बक्षीस दिले जाईल. पाच थर रचून सलामी देणाऱ्या संघांना पाच हजार, तर सहा थर रचणाऱ्या संघांना 10 हजार रुपये बक्षीस दिले जाईल. यावर्षी महिला संघांनाही सहभाग घेता येणार आहे. पुणे व मुंबईतील महिला संघांनी येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना प्रोत्साहनपर 25 हजार रुपये दिले जातील. महिलांचे तीन संघ सहभागी झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र दहीहंडी कमी उंचीवर लावण्यात येईल.'' 

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांना निमंत्रित केले आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल. सहभागी संघातील खेळाडूंसाठी भगीरथी महिला संस्थेच्या बचत गटाकडून जेवणाची सोय केली आहे. याशिवाय श्रीमंत ढोल-ताशा पथक, सार्थक क्रिएशनच्या वतीने नृत्याविष्कार असे कार्यक्रम होतील. या वेळी "गोकुळ'चे संचालक रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड, उत्तम पाटील, सागर बगाडे, विजय टिपुगडे आदी उपस्थित होते. 

डॉल्बीला आमचाही विरोधच 
या दहीहंडीच्या कार्यक्रमात कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावला जाणार नाही. आपला डॉल्बीला विरोधच राहील. त्याऐवजी चांगल्या साउंड सिस्टीमची सोय केली आहे. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे श्री. महाडिक यांनी सांगितले. 

छायाचित्रकारांसाठी स्पर्धा 
या दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रकारांसाठी स्पर्धा घेण्यात येईल. मोबाईल व कॅमेरा याद्वारे फोटो काढणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. दहीहंडीचे चांगले फोटो काढणाऱ्या बक्षिस दिले जाईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे दहा, सात व तीन हजार रूपये रोख बक्षिस दिले जाईल, असेही श्री. महाडीक यांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news dahihandi