धरणे भरली, पण चिंता कायम

धरणे भरली, पण चिंता कायम

जलसंपदा विभागही ‘वेट ॲन्ड वॉच’वर : पाणीसाठ्याच्या नियोजनाची तयारी

कोल्हापूर - पावसाने ओढ दिल्याने जलसपंदा विभागही सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ च्या भूमिकेत असून येत्या महिन्यातभरात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठ्याचेही नियोजन करावे लागणार आहे. पहिल्यांदा पिण्याचे पाणी नंतर शेती आणि उद्योग असे नियोजन होईल.

गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने माळरानावरची पिके धोक्‍यात आली आहेत. मध्यंतरीच्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले तरी उगवलेली पिके तग धरून राहतील की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. श्रावण महिना हा उन्ह पावसाचा खेळ मानला जातो.

महिना संपत आला तरी श्रावणाच्या सरी काही बरसल्या नाहीत. गगनबावडा, आंबा, चंदगड, राधानगरी दाजीपूर, असा घाटमाथ्याचा भाग वगळता जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाने उघडीप दिली आहे. जून असाच कोरडा गेला, जुलैमध्ये काही दिवस पाऊस सुरू झाल्याने किमान धरणे तरी भरली. पिण्याचा पाण्याचा वर्षभराचा प्रश्‍न निकालात निघाला तरी शेतीसाठीच्या उपशाचा विचार करावा लागणार आहे. पाऊस अजूनही बाकी आहे या आशेवर जलसंपदा विभाग आहे. महिन्याभरात पावसाने हजेरी लावली तरी शेती आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. मात्र तसे न झाल्यास धरणातील पाणीसाठ्याचेही वर्षासाठी नियोजन करावे लागेल. दरवर्षी जुलैच्या पंधरवड्यात पुरेल इतके पाणीसाठ्याचे नियोजन असते. 

राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे लघु पाटबंधारे आदी प्रकल्प आहेत. सरासरी पाणीसाठी नव्वद टक्‍क्‍यांवर आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी १७७२ मिलिमीटर इतकी आहे. आतापर्यंत ८२८ मिलिलिटर  इतका पाऊस झाला आहे. घनदाट झाडी आणि पावसाळी भाग अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात घाटमाथा वगळता यंदा पावसाने विश्रांती घेतली आहे. हातकणंलेपासून पुढे शिरोळ तसेच सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणचा परिसर कोरडा पडला आहे. 

वर्षभर पुरले इतक्‍या पिण्याच्या पाण्याची बेजमी झाली आहे. पावसाची उघडीप राहिल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे.

पाण्याशिवाय पिके तरू शकत नाहीत आणि नदीकाठी उपसा बंदी लागू झाली तरी करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. बळीराजासमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. शेतीबरोबर उद्योगाच्या पाण्याचाही प्रश्‍न आहे. तूर्तास प्रश्‍नांवर पावसाची हजेरी हेच उत्तर आहे. धरणे भरली तरी महिन्यात पाऊस न पडल्यास नियोजनाच्या तयारीत जलसंपदा विभाग आहे.

जिल्ह्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. तूर्तास पाण्याची कोणतीच अडचण नाही. अजूनही पाऊस बाकी आहे. महिन्यात तो पाऊस दमदार हजेरी लावेल, अशी आशा आहे. तसे न झाल्यास वर्षभरासाठी पाणीसाठ्याचे नियोजन करावे लागेल.
- किरण पाटील, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

भात पीक धोक्‍यात
जिल्हयाच्या पश्‍चिम भागात प्रमुख्याने घेतले जाणारे भात पिक पावसाने उघडीप दिल्याने धोक्‍यात आले आहे.भातासाठी संततधार व नियमित पावसाची आवश्‍यकता असते.पण गेल्या आठ दिवसापासून खडखडीत ऊन पडल्याने भाताच्या वाढीवर याचा प्रतिकुल परिणाम होणार आहे.ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी शेतकरी पाटाने भातास पाणी देत आहे.पण केवळ पावसावर अंवलबून असणाऱ्या भात पिकास पावसाने दडी मारल्याने मोठा फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com