प्लास्टिकमुक्तीसाठी सरसावली डांगे गल्ली

सुधाकर काशीद
सोमवार, 31 जुलै 2017

बाटल्यांचा पुनर्वापर करून बनविल्या सुंदर वस्तू; गणेशोत्सवात देणार संदेश

बाटल्यांचा पुनर्वापर करून बनविल्या सुंदर वस्तू; गणेशोत्सवात देणार संदेश

कोल्हापूर - प्लास्टिकचा अनावश्‍यक वापर करू नका म्हटलं तर कोणी ऐकत नाही. प्लास्टिकचा वापर काही थांबत नाही. अर्थात कचऱ्याच्या रूपाने वाढत जाणारा प्लास्टिकचा डोंगर काही कमी होत नाही आणि प्रशासकीय पातळीवरही कोणी काही ठोस निर्णय घेत नाही... या परिस्थितीत प्रशासनाची वाट न पाहता जुन्या बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने प्लास्टिकमुक्तीसाठी त्यांच्या परीने एक अनोखे पाऊल उचलले आहे. प्लास्टिक बाटल्या आपल्याला नष्ट करता येत नाहीत, हे खरे आहे. पण या बाटल्यांचा पुनर्वापर करीत निदान त्याचा कचरा तरी कमी करावा म्हणून ही सारी डांगे गल्ली एकदिलाने राबते आहे. 

त्यांनी प्लास्टिक बाटल्यांपासून मनी प्लॅंट, पेन स्टॅंड, झुंबर अशा वस्तू बनविल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचा कचरामुक्ती हाच संदेश असणार आहे. सांदी, कोपऱ्यात, गटर, दलदल, नदीपात्र, तलावपात्रात कचऱ्याच्या रूपात पडून राहणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांना त्यांनी देखणे रूप दिले आहे. प्लास्टिक आपल्याला नष्ट करता येत नाही. पण याच प्लास्टिकच्या सहाय्याने निसर्गाला फुलविता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. एवढेच काय, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करता येते हे कागदावर नव्हे, प्रत्यक्ष कृतीतूनही ते दाखविणार आहेत.

गेले काही दिवस या मंडळाचे कार्यकर्ते प्लास्टिक बाटल्या गोळा करीत आहेत. ज्यांच्या घरात, दारात, प्लास्टिक बाटल्या पडून आहेत, त्यांनी या बाटल्या आणून द्याव्यात, असे आवाहन ते करीत आहेत. ‘‘या पोरांना बाटल्या गोळा करायला काय वेड लागलंय काय’’ अशी सुरुवातीला लोकांची प्रतिक्रिया होती. पण या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या बाटल्या मध्यभागी कापल्या.

त्यात माती भरली. त्यात छोटी-छोटी रोपे लावली. याबरोबरच या बाटल्यांना त्यांनी रंग, टिकल्यांनी सजावट केली. काही बाटल्यांना त्यांनी पेन स्टॅंडचा आकार दिला. सात-आठ बाटल्या कमी अधिक उंचीवर टांगून त्याला झुंबराचा डौल दिला.

गेले काही दिवस कार्यकर्त्यांबरोबरच गल्लीतली लहान मुले-मुली, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक या कामासाठी राबत आहेत. खूप देखणे मनी प्लॅंट त्यातून तयार होत आहेत. या पद्धतीने बनविण्यात आलेल्या मनी प्लॅंटची एक भिंतच बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिलाच प्रयत्न असल्याने अनेक अडचणीही येत आहेत.

याहून विशेष हे की हे मंडळ गणेशोत्सव सोहळ्यासाठी पैशांच्या रूपात वर्गणी घेत नाही. घरातील रद्दी, स्क्रॅप, जुने कपडे, दुधाच्या रिकाम्या पिशव्या असे साहित्य वर्गणी म्हणून स्वीकारले जाते. जेणेकरून लोकांच्या घरातील अनावश्‍यक साहित्य, अडगळ कमी होते व हे स्क्रॅप विकून मंडळाला वर्गणी जमा होते. यंदा प्लास्टिक कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा वेगळा प्रयत्न ते करणार आहेत. करायचं ते दणकेबाज या बुधवार पेठी थाटात सारी गल्ली एकदिलाने राबत आहे.

‘वर्गणी नको’चे फलक
गणेशोत्सव मंडळ आणि हातात पावती पुस्तक घेऊन फिरणारी तरुण मंडळी पाहिली की, वर्गणी वसुली असल्याने व्यापाऱ्यांना धडकीच भरते. या ना त्या मार्गाने ही वर्गणी वसूल केली जाते. पण डांगे गल्ली तरुण मंडळ ‘वर्गणी नको’ असे फलक घेऊन फिरते आणि गणेशोत्सव विधायक स्वरूपातही कसा साजरा करता येतो, याचे उदाहरण घालून देते.

Web Title: kolhapur news dange galli responsibilities for plasti free