पुलाचा धोका अगोदरच समजणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

जिल्ह्यातील २४ पुलांवर सेन्सर - अलर्टसह कंट्रोल रूमला माहिती
कोल्हापूर - महाड येथील सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील २४ पुलांना धोका असल्याची माहिती अगोदरच देऊ शकेल, अशी सेन्सर यंत्रणा बसवण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील २४ पुलांवर सेन्सर - अलर्टसह कंट्रोल रूमला माहिती
कोल्हापूर - महाड येथील सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील २४ पुलांना धोका असल्याची माहिती अगोदरच देऊ शकेल, अशी सेन्सर यंत्रणा बसवण्यात आली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील हे पूल या यंत्रणेमुळे अधिक सुरक्षित झाले आहेत. नदीची पाणी पातळी धोक्‍याच्या पातळीपर्यंत वाढली किंवा पुलाच्या ठराविक उंचीला पाणी पोचले की ही यंत्रणा संबंधित यंत्रणेला सतर्क करणार आहे. त्याचा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाबरोबरच या पुलाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईलवरही त्याचा संदेश मिळणार आहे. याशिवाय त्या पुलावरील धोक्‍याचा इशारा देणारा लाल बल्बही प्रज्वलित होणार आहे. त्यानंतर या पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात येईल. 

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल मध्यरात्री वाहून गेला. या पुलावरून खाली पडून सुमारे २८ जणांना जीव गमावण्याची वेळ आली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील ब्रिटिश कालीन पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटपासून ते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. काही पुलांचे स्ट्रकचरल ऑडिट पूर्ण झाले. त्यानंतर या पुलावर सुरक्षा यंत्रणा बसवण्याबरोबरच पुलाला धोका असल्याची पूर्वकल्पना देण्यासाठी सेन्सर बसवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या निर्णयानुसार शभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्यमान झालेल्या किंवा शंभर मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या पुलांना हा सेन्सर बसवण्याचा निर्णय झाला. कोल्हापूर जिल्ह्यात ब्रिटिशकालीन व त्यानंतरचे मिळून सुमारे ४२५ छोटे-मोठे पूल आहेत. यापैकी २४ पुलांचे आयुष्यमान मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे. अशा सर्व पुलांवर ही यंत्रणा बसवण्याचे काम काल पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर येथील आयटी विभागाने ही यंत्रणा विकसित केली आहे. एका पुलावरील या यंत्रणेसाठी या विभागाला ६३ हजार रुपये खर्च आला. 

शिवाजी पुलावर यंत्रणा नाही
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुलावर ही यंत्रणा बसवली, पण शिवाजी पुलावरच ही यंत्रणा नाही. हा पूल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येत असल्याने त्याचा समावेश केला नाही. तसेच शिवाजी पूल ते पुढे रत्नागिरीपर्यंत या रस्त्यावर जे जे पूल आहेत, त्यावरही याच कारणांनी ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. 
 
पुलांच्या सुरक्षेला प्राधान्य-साळुंखे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जे पूल जुने व लांबीने जास्त आहेत, त्यावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे पुलाला असणारा संभाव्य पुराचा धोका लगेच समजेल, त्यानंतर तातडीने या पुलावरील वाहतूक बंद केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पूल
पुलांची एकूण संख्या    ४२५
१०० मीटर पेक्षा लांब पूल    २७
सेन्सर बसवलेले पूल    २४

Web Title: kolhapur news The danger of bridge is already understood