रस्त्यावरचा एक खड्डा सात वर्षांपासून घेतोय जीव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळचा हा खड्डा एक नव्हे, दोन नव्हे; तब्बल सात वर्षे जसा आहे तसाच आहे. हा रस्ता म्हणजे कोल्हापुरातला मुख्य मार्ग. रोज एखाद-दुसरा अपघात या खड्ड्यामुळे ठरलेला. लोकांच्या मनात एकच प्रश्‍न- हा खड्डा का बुजविला जात नाही?

कोल्हापूर -  राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळचा हा खड्डा एक नव्हे, दोन नव्हे; तब्बल सात वर्षे जसा आहे तसाच आहे. हा रस्ता म्हणजे कोल्हापुरातला मुख्य मार्ग. रोज एखाद-दुसरा अपघात या खड्ड्यामुळे ठरलेला. लोकांच्या मनात एकच प्रश्‍न- हा खड्डा का बुजविला जात नाही? सहा महिन्यांपूर्वी राज्यपालांचा दौरा निश्‍चित झाला आणि या रस्त्यावरून ते जाणार म्हणून हा खड्डा कसाबसा बुजविला गेला. विशेष हे, की मूळ काम तसेच असल्याने त्या कामासाठी पुन्हा रस्ता उकरला गेला आणि या खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून बाजूला लावलेल्या नळाला धडकूनच रविवारी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

या रस्त्याचे सात वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले. त्या वेळी रस्त्याची उंची वाढली. मात्र, या रस्त्याला क्रॉस होणाऱ्या गटारीच्या पाण्याची व रस्त्याची लेव्हल जुळलीच नाही. परिणामी, पावसाचे पाणी आसपासच्या परिसरातच पसरू लागले. ही लेव्हल जुळविण्यात रस्त्याखालून जाणाऱ्या ड्रेनेज पाइपचा अडथळा येऊ लागला. परिणामी, आज बघू, उद्या बघू म्हणत हा क्रॉसिंगवरचा खड्डा तसाच राहिला. वळण घेताना चूक झाली, की या खड्ड्यात वाहनाचे एखादे तरी चाक जायचे व अपघात व्हायचा, हे जणू ठरूनच गेले. चार वर्षांपूर्वी दोघांचा याच ठिकाणी मृत्यू झाला.   

या खड्ड्याबद्दल लोक इतके संतप्त आहेत की गेली पाच वर्षे या परिसरातील रहिवाशांनी महापालिकेची पाठच धरली. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या खड्ड्याची पाहणी केली. रविवारीच (ता. १६) आयुक्त अभिजित चौधरी यांनीही पाहणी केली. तातडीने काम पूर्ण झाले पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

दोन महिन्यांपूर्वी काम सुरू झाले. त्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पंधरा दिवस होऊनही काम सुरू व वाहतूक बंद यामुळे पोलिसांनी आक्षेप घेतला. इतके दिवस हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवणे योग्य नाही, अशी पोलिसांनी भूमिका घेतली. त्यामुळे निम्मा रस्ता सुरू केला गेला. पण, पावसाळा सुरू झाल्याने काम थांबले व या खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून मोठे चार नळ खड्ड्याभोवती टाकले गेले. या नळाला कोणी धडकू नये म्हणून त्याला लोकांनी चुन्याने रंगविले. पण, या नळालाही वाहनचालक धडकू लागले.

जुजबी कामही अवघड
मुख्य रस्त्यावर एक सात बाय सातचा खड्डा सात वर्षांहून अधिक काळ जशाच्या तसा... यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त होत्या. त्यामुळे आता पुन्हा काम सुरू होईल, असे चित्र होते. त्यातला एक भाग म्हणून सांडपाण्याची गटार नवा मार्ग काढून माजी नगरसेवक शशिकांत पाटील यांच्या शेतापर्यंत नेण्यात येत होती. पण, मुळात नवा रस्ता करतानाच युटिलिटी शिफ्टिंगची खबरदारी घेतली नसल्याने जुजबी कामही सोपे नव्हते. त्यामुळे खड्डा तसाच राहिला. त्या भोवतीचे नळही तसेच राहिले आणि आज दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.

Web Title: kolhapur news dangerous pits on road