राज्यात ४३ हजार गावांत ‘दारवाड’ मॉडेल - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

शेतीचे उत्पादन वाढले आहे, मात्र शेतीमालाची विक्री हा मोठा प्रश्‍न आहे. दारवाड (ता. भुदरगड) येथे भात पिकासाठी हा प्रयोग राबविला. भात विकत घेऊन दोनशे रुपये अधिक शेतकऱ्यांना देणार आहे. भुईमूग, सोयाबीन, तूर, अन्य पिके कार्पोरेट पद्धतीने विकली जाणार आहेत. ४३ हजार गावांत दारवाड मॉडेल राबविणार आहोत.

- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - ‘शेतीमाल कार्पोरेट पद्धतीने विकून शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते. शेतीमाल विकत घेण्याचे ‘दारवाड’ मॉडेल राज्यातील ४३ हजार गावांना लागू करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भीमा कृषी प्रदर्शनास शुक्रवारपासून मेरी वेदर मैदानावर प्रारंभ झाला. अदृश्‍य काडेसिद्धेश्‍वर स्वामी अध्यक्षस्थानी होते. प्रदर्शनाचे सर्वेसर्वा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, अरुंधती महाडिक, अरुण इंगवले, ललित गांधी, रामराजे कुपेकर, प्रशांत पाटील, बाबा देसाई, सत्यजित भोसले आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘खासदार महाडिक आणि त्यांच्या सौभाग्यवती अरुंधती या सातत्याने समाजासाठी काही ना काही तरी करण्यासाठी धडपडत असतात. महाडिक यांनी मध्यंतरी धान्य बॅंक सुरू केली. त्यांच्या कृषी प्रदर्शनाचे यंदा अकरावे वर्ष आहे. शेतकऱ्याला ज्या सुविधा शहरात मिळतात, त्या गावातच मिळाल्या की त्याला गावात राहायला आवडेल. शेतीचे उत्पादन वाढले आहे, मात्र शेतीमालाची विक्री हा मोठा प्रश्‍न आहे. दारवाड (ता. भुदरगड) येथे भात पिकासाठी हा प्रयोग राबविला. भात विकत घेऊन दोनशे रुपये अधिक शेतकऱ्यांना देणार आहे. भुईमूग, सोयाबीन, तूर, अन्य पिके कार्पोरेट पद्धतीने विकली जाणार आहेत. ४३ हजार गावांत दारवाड मॉडेल राबविणार आहोत. पीक घेण्यासाठी जो निविदा भरेल त्याने फायदा घ्यावा. तोटा होईल त्याची भरपाई सरकार करेल. विकत घेतलेले पीक कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवले जाईल. चांगला भाव आला की कार्पोरेट कंपन्या हे पीक विकतील, कृषी उत्पन्न बाजार समित्याही जोडल्या जातील. ज्याला सामूहिक ठिबक सिंचन करायचे आहे त्याने मला येऊन भेटा. ॲटोमाईज सोलर बेसवर शेती काळाजी गरज बनली आहे.

महादेवराव महाडिक यांनी दुग्ध व्यवसायासोबत साखर उद्योग अडचणीत असल्याचे सांगितले. देशभरात एकूण दूध उत्पादन किती होते, त्यात राज्याचा वाटा किती, वाढीव दुधामुळे निर्माण झालेल्या अडचणी, अतिरिक्त पावडर यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याचे सांगितले. 

शेतकऱ्यांनी अतिलोभापायी शेतीची तब्येत बिघडवून ठेवली आहे. ‘रासायनिक खतांच्या अति वापरामुळे पोत बिघडला. एकरी खर्च वाढला; मात्र अपेक्षित उत्पन्न घटले. जे बाजारात विकत मिळते, ते आपल्या सभोवतालीच आहे, याचा विसर पडला. तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. शेतकऱ्याने मालकासारखे राहावे. स्वावलंबी आणि स्वाभिमानी आयुष्य जगून नोकराच्या भूमिकेत जाऊ नये.

- काडसिद्धेश्‍वर स्वामी

खासदार महाडिक यांनी शेतीतील नव्या प्रयोगाची माहिती मिळावी, या उद्देशाने प्रदर्शन भरविल्याचे नमूद केले. जागतिक दर्जाचे अधिकचे उत्पन्न कसे घेतात त्या दृष्टीने अवजारे, खते, तणनाशकाचा वापर कसा होतो. याची माहिती या माध्यमातून मिळेल. शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. जातिवंत जनावरे आणि तीनशे ते साडेतीनशे स्टॉल्स, बचत गटांचे स्टॉल हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. शेतीचे क्षेत्र कमी होत चालल्याने व्हर्टिकल फार्मिंग आपल्याला स्वीकारायला लागेल. जगाच्या पातळीवर अशाच पद्धतीने फार्मिंग केले जाते. केंद्र सरकारची धोरणे चुकत असल्याचे सांगून महाडिक यांनी साखर कारखानदारांची सर्कस सुरू असल्याचे सांगितले. ३१०० रुपयांची एफआरपी बंधनकारक असताना साखरेचे भाव २८५० पर्यंत खाली आले. दरावर नियंत्रण राहिले राहिले तर शेतकरी टिकणार नाही. शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे. तो जगला तरच देश जगेल. को जनरेशन प्लॅन्ट उभारला; पण विजेचे दर निश्‍चित होत नाहीत. याकामी पालकमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन महाडिक यांनी केले.

जिजामाता शेतीभूषण पुरस्काराने गौरव
प्रयोगशील महिला शेतकऱ्यांना जिजामाता शेतीभूषण पुरस्काराने गौरविले. यात शारदा पाटील, ऊर्मिला आगळे, पवित्रा पाटील, सविता पाटील, राजश्री निंबाळकर यांचा समावेश आहे. डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. शैलेश कांबळे, डॉ. राजेंद्र हासूरे यांचा कृषी संशोधक पुरस्काराने, तर अन्य शेतकऱ्यांचाही पुरस्काराने सन्मान झाला.

Web Title: Kolhapur News Darvad Model in 43 thousand villages