भावजयीच्या निधनानंतर नणंदेनेही सोडला श्‍वास..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

कळंबा - रायगड कॉलनी येथील सुमन रामचंद्र चौगुले (वय ६२) यांना काल (ता. २०) सायंकाळी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी त्यांची नणंद हौसाबाई मारुती पवार (६३, रा. शिये) यांना कळताच रात्री बाराच्या सुमारास त्या आल्या. त्यांनी हंबरडा फोडला आणि हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचाही तेथेच मृत्यू झाला.

भावजय आणि नणंद असो किंवा एकूणच नातेसंबंधांवर बेतलेल्या अनेक मालिकांची सध्या चलती आहे. एकमेकांविरोधात त्यांच्या सुरू असलेल्या कुरघोड्या, अशी या मालिकांची थीम. पण, या साऱ्या गोष्टींना छेद देणारी ही घटना काल रात्री रायगड कॉलनी परिसराने अनुभवली. 

सुमन चौगुले यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. घरच्यांनी घडलेली घटना पै-पाहुण्यांना दूरध्वनीवरून कळवली. पै-पाहुणे, रायगड कॉलनी परिसरातील लोक जमू लागले. अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. दरम्यान, हौसाबाई पवार हंबरडा फोडतच दाखल झाल्या. काही मिनिटे होतात न होतात तोच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचाही तेथेच मृत्यू झाला. एकूणच नणंद आणि भावजय या नात्याविषयी घटनास्थळी चर्चा सुरू झाली. त्याची वर्तमानाशी आणि एकूणच नातेसंबंधांशी सांगड घातली जाऊ लागली. या दोघीही ज्येष्ठ असल्या तरी त्यांची ही अशी अनपेक्षित ‘एक्‍झिट’ मात्र साऱ्यांनाच चटका लावणारी ठरली.

Web Title: Kolhapur News Death in Raigad Colony