डेंगीचे संकट डॉ. पाटील यांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

कोल्हापूर - डेंगीच्या प्रश्‍नावरून महापालिका सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. प्रशासनालाच डेंगीची लागण झाल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा सदस्यांनी घेतला. त्याची दखल घेत प्रभारी मुख्य आरोग्यनिरीक्षक डॉ. विजय पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

कोल्हापूर - डेंगीच्या प्रश्‍नावरून महापालिका सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. प्रशासनालाच डेंगीची लागण झाल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा सदस्यांनी घेतला. त्याची दखल घेत प्रभारी मुख्य आरोग्यनिरीक्षक डॉ. विजय पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

‘घरोघरी डेंगीचे रुग्ण आढळून येत असताना आरोग्य विभाग धूरफवारणी करण्यातच व्यस्त आहे. नुसती कागदोपत्री आकडेवारी दिली जाते. माणसे मेल्यावरच जागे होणार का? धूरफवारणीने डास तर लांबच, साधी मुंगीही मरत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षापोटी डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च प्रशासनाने करावा,’ अशी मागणी बहुतांश सदस्यांनी केली.

सत्यजित कदम म्हणाले,‘‘माझ्या प्रभागात लोखंडे नावाच्या व्यक्तीच्या रूपाने डेंगीचा पहिला बळी गेला. प्रशासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये अशी विचारणा त्यांनी केली. दिलीप पवार यांनी त्यांच्या भागातील डेंगीचा रुग्ण कोमात गेला असून, त्याचा दिवसाचा खर्च २० हजार आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक वॉर्डामध्ये १० ते १२ रुग्ण आहेत. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनाच नव्हे, तर प्रशासनालाच डेंगी झाला आहे असे सांगितले. या सर्व प्रश्‍नांवर उत्तरे देण्यासाठी डॉ. दिलीप पाटील बोलण्यास उभे राहिले. त्यांनी जानेवारीपासून जूनपर्यंतची आकडेवारी देण्यास सुरवात केली; मात्र ही आकडेवारी बोगस असल्याचे सांगून सदस्य अधिक आक्रमक झाले. महेश सावंत यांनी आयुक्तांची काही जबाबदारी आहे की नाही अशी विचारणा करून अधिकारी खासगी रुग्णालयाचे हप्ते घेतात असा आरोप केला. एका घरातून ५ सदस्यांना डेंगीची लागण होत असताना आयुक्तांनी काय चौकशी केली अशी विचारणा त्यांनी केली.

शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, रूपाराणी निकम यांनी आक्रमकपणे मते व्यक्त केली. आयुक्तांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असे वहिदा सौदागर यांनी सुनावले. महेश सावंत यांनी आयुक्त कुठल्याही कामाची जबाबदारी स्वीकारत नाहीत, अधिकारी खासगी डॉक्‍टरच्या सुपाऱ्या घेतात असा आरोप केला.

आयुक्तांनी एका तरी घरामध्ये पाहणी केली का, अशी विचारणा नियाज खान यांनी केली. पूजा नाईकनवरे यांनी डेंगीमुळे माणसांचे जीवन हैराण झाले असून प्रत्येक भागात रुग्णांना दवाखान्यात नेण्याचेच काम सदस्यांना राहिले आहे असे सांगितले. कविता माने यांनी रिपोर्टमधील घोळ सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह येणारा अहवाल खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह कसा होतो अशी विचारणा केली. सर्वच सदस्यांनी डॉ. विजय पाटील यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. 

आरोग्यनिरीक्षक विजय पाटील हे माणसांचे नव्हे, तर जनावरांचे डॉक्‍टर आहेत. त्यामुळे त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही. 
- भूपाल शेटे

चित्रनगरीला बाबूराव पेंटर यांच्या नावाचा ठराव 
सभेमध्ये चित्रनगरीला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे नाव द्यावे, असा सदस्य ठराव झाला. सभेत हा ठराव मांडला. त्यानंतर एकमताने हा ठराव संमत करण्यात आला. प्रसारमाध्यमांना माहिती देताना प्रथम महापौरांनी भालजी पेंढारकर यांचे नाव घेतले. मात्र, नंतर त्यांनी आपल्या चुकीची दुरुस्ती करत बाबूराव पेंटर यांचे नाव सांगितले. 

Web Title: Kolhapur News Dengue issue in Corporation meeting