मैदान न देण्यामागे कोती, खलनायकी वृत्ती - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - महानगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या आडून भिमा कृषी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्यासाठी सत्तेतील एक नेता कार्यरत असून खलनायकी नेत्याची कोती वृत्ती असल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे लगावला. 

कोल्हापूर - महानगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या आडून भिमा कृषी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्यासाठी सत्तेतील एक नेता कार्यरत असून खलनायकी नेत्याची कोती वृत्ती असल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे लगावला. 

दहा वर्षे याच मैदानावर भिमा कृषी प्रदर्शन भरते; पण कारभाऱ्यांना पुढे करून सत्तेतील या नेत्यांना मैदान खेळासाठीच देण्याचा ठराव करून घेतला. यामागे खेळाडूविषयी आस्था नाही, तर प्रदर्शनाला विरोध आहे. राजकारण किती खालच्या थराला जाऊन करायचे यालाही मर्यादा आहेत. ज्यांना नैतिकता नाही, अशी मंडळी राजकारण करत शेतकऱ्यांच्या व महिला बचत गटांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून दहा वर्षांत लाखो शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान मिळाले, प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान झाला, दरवर्षी ६ ते ७ कोटींची उलाढाल झाली. 

असे प्रदर्शन भरवण्यात आडकाठी आणून विरोधक आपली कोती मनोवृत्ती व शेतकरीविरोधी भूमिका दाखवून देत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मी पदरमोड करून हे प्रदर्शन भरवतो. खासदार असताना आणि नसतानाही हे प्रदर्शन भरवले. त्यामागे केवळ विकासाची दृष्टी आणि शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान, कृषिपूरक उद्योगांची भरभराट व्हावी, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळावी, पशू-पक्ष्यांबद्दल माहिती मिळावी हाच उद्देश आहे. 
प्रदर्शनाच्या चार दिवसांच्या काळात महिला बचत गटांना प्रचंड मोठा अर्थिक लाभ होत असल्याने त्यांच्या प्रंपचालाही हातभार 
लागतो. मात्र हे प्रदर्शन भरवण्यात आडकाठी महिलांच्या संसारात पाणी ओतण्याचे काम काहीजण करत आहे, त्यांना या कष्टकरी महिलांचा तळतळाट लागल्याशिवाय रहाणार नाही, असा टोलाही लगावला आहे. 

प्रदर्शनाचे चार दिवस व तयारीचे आठ दिवस सोडले तर इतर दिवशी हे प्रदर्शन खेळाडूंसाठी खुलेच असते. प्रदर्शनामुळे खेळाडूंचे फार मोठे नुकसान होत नाही. मात्र केवळ राजकीय द्वेषातून मेरी वेदर मैदान भीमा कृषी प्रदर्शनाला उपलब्ध केले जात नाही. कोल्हापूरच्या सुज्ञ नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याचा विचार करून कृषी प्रदर्शनात आडकाठी आणणाऱ्या जाब विचारण्याची गरज आहे. कायदेशीर व सनदशीर मार्गाने आम्ही भीमा प्रदर्शनासाठी है मैदान मिळावे, यासाठी प्रयत्न करत असून त्याला निश्‍चितच यश येईल. मात्र यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय खलनायकी वृत्ती कोणत्या थराला पोहचली हे दिसून आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Kolhapur News Dhananjay Mahadik comment