योग्य प्रकारे ठराव करून धनगर समाजास आरक्षण - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर -  ‘‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेने सकारात्मक अहवाल दिला असून राज्य शासन योग्य प्रकारे ठराव करून धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करेल,’’ असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले. 

कोल्हापूर -  ‘‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेने सकारात्मक अहवाल दिला असून राज्य शासन योग्य प्रकारे ठराव करून धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करेल,’’ असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले. 

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दसरा चौकात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनीही मोर्चा आणि मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आंदोलनास पाठींबा दिला.

पालकमंत्री म्हणाले, ‘‘झोपेतही दिलेली आश्‍वासने पाळण्याचे काम भारतीय जनता पक्ष करते. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन आम्ही दिले आहे. तो शब्द आम्ही पाळणारच आहे. या समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे. निवडणुकीत हा समाज आमच्यासोबत होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षात दोन कॅबिनेट मंत्री आणि राज्यसभेवर एक खासदार असे आमच्या पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे या समाजाविषयी श्रद्धा आणि आस्था आपल्याला आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या मोर्चाला येण्यापूर्वी आमचे मंत्रिमंडळातील सहकारी राम शिंदे यांच्याकडून मी धनगर आरक्षणाचा प्रश्‍न समजून घेतला आहे. त्यामुळे या प्रश्‍नाची आपल्याला माहिती आहे. काँग्रेस पक्षाने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे.’’

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘हा प्रश्‍न केंद्रीय पातळीवर सुटणारा आहे. लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार आहेत. त्यामुळे या खासदारांमार्फत धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही या समाजासोबत आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रश्‍न निश्‍चितपणे मांडू आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू.’’

कृष्णात शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी दीपक शेळके, बाळासो मोठे, बाबूराव बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगल वळकुंजे, चंद्रकांत वळकुंजे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, प्रा. संध्या जागनवार, गणी आजरेकर यांच्यासह जिल्ह्यातून आलेले धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

पालकमंत्र्यांनी भंडारा उचलून आश्‍वासन द्यावे : सतेज पाटील
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘निवडणुकीत पंधरा दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न मिटवू, असे आश्‍वासन भाजप सरकारने दिले होते. आता पालकमंत्र्यांना खरे तर याचाच जाब विचारण्याची गरज आहे. पंधरा दिवसांत आरक्षण देण्याचे काय झाले, याचे उत्तर पालकमंत्र्यांनी देण्याची गरज होती. आता त्यांनी भंडारा उचलावा आणि मगच आरक्षण कधी देणार हे सांगावे. रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही हे आता समजले आहे. धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरच्या शाहूनगरीतून त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एकजुटीने आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवावा लागेल.’’

पोलिसांकडून सकाळपासून बंदोबस्त
धनगर समाजाच्या मोर्चाची वेळ दुपारी दोन वाजताची होती; पण अनेक कार्यकर्ते ग्रामीण भागातून येणार असल्याने हा मोर्चा दुपारी सव्वा तीन वाजता गांधी मैदान येथून सुरू झाला. मोर्चासाठी मात्र सकाळी आठपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक शाखेचे पोलिस तर सकाळी सातपासून ड्युटीवर होते.

दौरे रद्द करून मोर्चासाठी पालकमंत्री कोल्हापुरात 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘धनगर क्रांतिकारी संघाचे संस्थापक विलास वाघमोडे आणि आपली मैत्री आहे. याशिवाय या समाजाविषयी मला श्रद्धा आहे असल्यामुळे नगरहून मी इतर दौरे रद्द करून कोल्हापुरात आलो आहे. या मोर्चाचे निवेदन मी स्वीकारेन असे आश्‍वासन दिले होते.’’

Web Title: Kolhapur News Dhangar community reservation issue