‘धनगर क्रांतिकारी’तर्फे ४ ला रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे रविवारी (ता. ४ फेब्रुवारी) धनगर समाज आरक्षण रॅलीचे आयोजन केल्याची माहिती संयोजक, संस्थापक अध्यक्ष विलासराव वाघमोडे (बापू) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर - धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे रविवारी (ता. ४ फेब्रुवारी) धनगर समाज आरक्षण रॅलीचे आयोजन केल्याची माहिती संयोजक, संस्थापक अध्यक्ष विलासराव वाघमोडे (बापू) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. वाघमोडे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले अनुसूचित जमातींचे एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण राज्य शासनाने केंद्राकडे शिफारशीसाठी पाठवावे आणि या समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करावे, यासाठी ही जनजागृती रॅली आहे. रॅलीस गांधी मैदान येथून दुपारी १२.३० ते एक दरम्यान प्रारंभ होईल. अंदाजे २५ हजार समाजबांधव रॅलीत सहभागी होतील. 

...अन्यथा वर्षा बंगल्यासमोर ढोलवादन
श्री. वाघमोडे म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र शासनाने धनगर समाज आरक्षणाची मागणी मंजूर न केल्यास पालकमंत्री पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर दिवसभर ढोलवादन आंदोलन करण्यात येईल. प्रतीकात्मक पद्धतीने श्री बिरोबाचे मंदिरही उभे करण्यात येईल.’’

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, ऐरोलीचे (नवी मुंबई) आमदार संदीप नाईक, सुरेशराव शेंडगे यांच्या उपस्थितीत ध्वज दाखवून रॅलीचे उद्‌घाटन होईल. रॅली महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी पुतळा, बिंदू चौकमार्गे दसरा चौक येथे सायंकाळी पाच वाजता येईल.

यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत होईल. सभेत समाजाच्या विविध प्रश्‍नांवर निवडक कार्यकर्त्यांची भाषणे होतील. रॅलीदरम्यान मार्गात येणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा, पुतळ्यांना संघटनेतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात येतील. रॅलीत राजमाता अहल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेला चित्ररथ असेल. चौकाचौकात गजनृत्य, पारंपरिक धनगरी ओव्या, धनगरी ढोलवादन, लेझीमपथक, मर्दानी खेळांचा समावेश असेल. पर्यावरणाचा जागर करणारे फलक असतील. 

एसटी प्रवर्गाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात येईल. हे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनाही देण्यात येईल. सर्वपक्षीय खासदार, आमदारांनाही निवेदन देण्यात येईल.’’  
श्री. वाघमोडे यांनी जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी, समाजातील सर्व संघटनांनी आपसातील हेवेदावे विसरून सामाजिक प्रश्‍नांसाठी रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, आर. के. पोवार, आकाश शेलार, उमेश पोर्लेकर, सुजय पोतदार, अनिल कदम, नगरसेवक रिना कांबळे, रिंकू देसाई, संदीप टोणे आदी मान्यवरांनी रॅलीसाठी पाठिंबा जाहीर केला. 

पत्रकार परिषदेला संघाचे उन्मेष वाघमोडे, जिल्हाध्यक्ष कृष्णात शेळके, युवक जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव बोडके, जिल्हा सचिव बाळासाहेब मोटे, नितीन गावडे, कोंडीबा जानकर, बाबूराव आडुळकर, अभिजित बत्ते, विकास घारगे, मच्छिंद्र बनसोडे आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Kolhapur News Dhangar Krantikari Rally on 4 Feb