धनगरवाड्यांवर संपर्कासाठी धडपड

शिवाजी यादव
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - डोंगरी भागात धो-धो पाऊस, रात्री-अपरात्री एखादा बिबट्या, गवा आदी वन्यजीव धनगरवाड्यालगत आला तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा कल्लोळ उठतो... अशात कोणाच्या घरी वयोवृद्धाची प्रकृती अचानक बिघडते, कधी बाळंतिणीला अचानक वेदना सुरू होते, तर कधी गावात कोणाच्या घराची भिंत पडते. अशा कोणत्या ना कोणत्या गंभीर प्रसंगांत पश्‍चिम घाटातील धनगरवाडे भीतीने नव्हे तर गैरसोयीने हवालदिल होतात. मोबाईल असला तरी रेंजमुळे फोन लागेल, याची शाश्‍वती कमीच. अशा धनगरवाड्यांना धीर देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो लॅंडलाईन फोन...

कोल्हापूर - डोंगरी भागात धो-धो पाऊस, रात्री-अपरात्री एखादा बिबट्या, गवा आदी वन्यजीव धनगरवाड्यालगत आला तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा कल्लोळ उठतो... अशात कोणाच्या घरी वयोवृद्धाची प्रकृती अचानक बिघडते, कधी बाळंतिणीला अचानक वेदना सुरू होते, तर कधी गावात कोणाच्या घराची भिंत पडते. अशा कोणत्या ना कोणत्या गंभीर प्रसंगांत पश्‍चिम घाटातील धनगरवाडे भीतीने नव्हे तर गैरसोयीने हवालदिल होतात. मोबाईल असला तरी रेंजमुळे फोन लागेल, याची शाश्‍वती कमीच. अशा धनगरवाड्यांना धीर देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो लॅंडलाईन फोन... त्याच फोनची तंदुरुस्ती ठेवण्यासाठी भारतीय दूरसंचार निगमच्या ६० हून अधिक मेकॅनिक वस्तीकरांची झोप बिनधास्त घडवत आहेत.  

चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या जंगली भागाच्या पोटात जवळपास १५० हून अधिक वाड्या-वस्त्या, धनगरवाडे आहेत. तेथून मुख्य रस्त्यावर जाण्यास किमान ३ ते १० कि.मी.ची पायपीट होते. यातील निम्म्याहून अधिक धनगरवाड्यांत किमान ६ ते ५० दूरध्वनी जोडण्या आहेत. प्रत्येक घरातील फोन सतत चालू ठेवण्यासाठी तालुक्‍याला किंवा मोठ्या गावाजवळ एक्‍स्चेंज आहे; तर गावातील फोनला सुरू ठेवण्यासाठी ध्वनीलहरींसाठी ऊर्जा पोचविणारी एकच केबल लाईन आहे. ती तुटली किंवा खराब झाली तर संपूर्ण गावातील फोन बंद पडतात. त्यामुळे केबलच्या सुरक्षेपासून घराघरातील फोन सतत सुरूच राहावे, यासाठी काळजी घेण्याचे काम फोन मेकॅनिक करतात.  

दुर्गम भागात नव्या सुविधेचा, सेवेचा तंत्रज्ञान प्रकल्प उभारला की, तिथे रस्त्याची पायाभूत सुविधांचा अभाव पाहून दुर्गम भागात काम करणे टाळणारी अनेक मंडळी आहेत. त्यातून शासकीय योजना व खासगी सेवा वाडी-वस्तीपर्यंत सक्षम पोहोचत नाहीत. अशात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी मात्र ही उणीव भरून काढली आहे. कोणत्याही धनगरवाड्यात कोणाचाही फोन बंद पडला की, त्या घरातील अख्खं कुटुंब जगाशी संपर्क तुटल्यात जमा होते. त्यामुळे गावातील दूरध्वनी खंडित होणार नाही यासाठी वर्षानुवर्षे संकट झेलत फोन मेकॅनिक तत्काळ दुरुस्तीचे काम मोठ्या जिद्दीने करतात. एक्‍स्चेंजमधील बॅटरी चॅजिंग संपले तर अनेक फोन बंद पडतात. नवीन बॅटरी येण्याची वाट न बघता, कर्मचारी तिथल्या तिथे तांत्रिक दुरुस्ती करून किंवा पर्यायी बॅटरी लावून फोन सुरू ठेवण्यावर भर ठेवतात.

पावसाळ्यात वाटेवर चिखल पसरतो, वाट निसरडी होते अशात सर्प, गवे यांचा वावर असतो. पण अशाही स्थितीत मोटारसायकल किंवा पायी जाऊन केबल व कनेक्‍शन दुरुस्तीचे काम केले जाते. काम करताना कधी अंधार पडतो; पण दोघे-तिघे बॅटरीच्या उजेडात हे काम करतात. जंगली वाटेने गेलेल्या केबलची तंदुरुस्ती दोन-तीन दिवसाला तपासली जाते. एखाद्या ठिकाणी लुप कमकुवत झाला तर तातडीने जोडला जातो. हे सगळे काम नियमित असले तरी ८ तासांच्या ड्युटी बंधनात अडकण्यापेक्षा गावातील लोकांची सोय पाहून ड्युटी संपली तरी काही कर्मचारी गावात फेरी मारून लाईन चेकिंगचे काम केले जाते.

नेहमी सतर्कतेची गरज
फोन मेकॅनिक अहंमद जमादार (आंबा) म्हणाले, ‘‘साधारण २५ वर्षांपूर्वी डोंगरी भागात फोन सेवा सुरू झाली. रात्री वन्यजीव आला, कोणी आजारी पडले किंवा अपघात झाला, तातडीची मदत मागवायची झाल्यास शासकीय रुग्णवाहिका, वन विभाग, पोलिस, पशुशल्यचिकित्सक यांची गरज पडते. त्यासाठी फोन सतत सुरू राहणे हेच महत्त्वाचे आहे. गावात, धनगरवाड्यावर दर दोन तासाला फोन सुरू आहेत की नाही, याची खात्री करतो. जिथे संभाव्य बिघाड आहे, तिथे पूर्वदुरुस्तीचेही काम करतो.’’

Web Title: kolhapur news dhangarwada contact