आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवणार - धैर्यशील माने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज असलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी बेळगाव येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हेही होते. 

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज असलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी बेळगाव येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हेही होते. 

‘आम्ही राष्ट्रवादीपासून दूर गेलेलो नाही किंवा पक्षही सोडलेला नाही. आघाडीच्या राजकारणात आमच्यावर अन्याय होत असल्याने आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवणार आहे. पक्षाने आमचा विचार करावा,’ असे धैर्यशील माने यांनी श्री. पवार यांना सांगितले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास श्रीमती माने तयार असताना ऐनवेळी ही जागा काँग्रेसला देऊन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी दिली. बदलत्या राजकीय संदर्भात श्री. शेट्टी पुन्हा काँग्रेससोबत राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाईल. त्यामुळे आपल्या गटाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्‍यता माने गटाला आहे. श्री. शेट्टी यांचेही राजकारण हे पवारविरोधीच आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात श्री. पवार यांची नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात श्री. शेट्टी हेच आघाडीवर होते. पुन्हा शेट्टी यांनाच आघाडीत घेण्याच्या निर्णयावर माने गट नाराज आहे. 

कै. बाळासाहेब माने व श्रीमती माने यांनी प्रत्येकी पाचवेळा लोकसभेची निवडणूक लढवली. दोनवेळा श्रीमती माने राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाल्या; पण त्याच राष्ट्रवादीकडून त्यांना बेदखल केले जात असल्याची त्यांची भावना आहे. प्रत्येक निवडणुकीत ज्यांच्याविरोधात लढाई केली, त्याच श्री. आवाडे किंवा श्री. शेट्टी यांना पक्षनेतृत्व जवळ करत आहे, याचाही राग त्यांना आहे. त्यातून धैर्यशील माने यांनी लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली. श्री. पवार यांच्या भेटीतही धैर्यशील यांनी ही सर्व राजकीय पार्श्‍वभूमी सांगितली.

माने गटाची नाराजी का? 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला सोडताना श्रीमती माने यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द श्री. पवार यांनीच दिला; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत धैर्यशील यांची शिरोळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवार म्हणून घोषणा केली; प्रत्यक्षात पक्षाचे फॉर्म राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले. यामुळेच राष्ट्रवादीत माने गट नाराज आहे.

Web Title: Kolhapur News Dhiryasheel Mane meets Sharad Pawar