शिवसेनेचा जिल्हा बॅंकेवर ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

कोल्हापूर - कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा बॅंकेवर ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले असून योजनेला नाव शिवाजी महाराजांचे आणि अजेंडा अफजलखानाचा आहे, अशी टीका जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या वेळी केली.

कोल्हापूर - कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा बॅंकेवर ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले असून योजनेला नाव शिवाजी महाराजांचे आणि अजेंडा अफजलखानाचा आहे, अशी टीका जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या वेळी केली.

दरम्यान, उद्यापर्यंत या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रत्येक शाखेच्या बाहेर प्रसिद्ध करावी, अन्यथा बुधवारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयालाच टाळे ठोकले जाईल, असा इशारा श्री. पवार यांनी दिला. यावर पात्र शेतकऱ्यांची यादी निश्‍चित नसून, शासनाचे निकषच अजून व्यवस्थित आलेले नाहीत. त्यामुळे यादी प्रसिद्ध करण्याऐवजी उद्या शेतकऱ्यांची संख्या बॅंकेबाहेर  
लावण्यात येईल, असे आश्‍वासन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी शिष्टमंडळाच्या मोर्चासमोर जाऊन निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.  

मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी ट्‌विटरद्वारे जाहीर केली. ही माहिती योग्य नसल्याचा आरोप करत आज राज्यभरातील जिल्हा बॅंकांसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल-ताशा वाजवून मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातही ‘चुकीची माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असो’, ‘शिवसेनेचा एकच नारा, सातबारा कोरा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ यांसारख्या घोषणा देऊन शिवसैनिकांनी जिल्हा बॅंकेचा परिसर दणाणून सोडला. 

बी. टी. कॉलेजपासून या मोर्चाला सुरुवात झाली. बॅंकेच्या दारात मोर्चा अडवण्यात आला. या वेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, ‘ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. जादूगार ज्याप्रमाणे जादूचे खेळ दाखवतो, तसाच प्रकार गेली तीन वर्षे राज्य सरकारकडून सुरू आहे. बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्जदारांच्या दारात ढोल-ताशा वाजवला म्हणून आम्हीही तेच आंदोलन संपूर्ण सातबारा कोरा व्हावा, यासाठी करत आहे.’

विजय देवणे यांनी एकेरी भाषेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘कर्जमाफीसाठी झालेले पहिले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला; पण पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी हा लढा चालू ठेवला, त्या शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना असेल. निकषाचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न झाला तर सरकारची अब्रू चव्हाट्यावर काढल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील.’’ या वेळी मुरलीधर जाधव यांचेही भाषण झाले. 

आंदोलनात सुजित चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, बाजीराव पाटील, सुनील शिंत्रे, महादेव गौड, रवी चौगुले, दुर्गेश लिंग्रस, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, शुभांगी पोवार, मंगल चव्हाण, रिया पाटील, दीप्ती कोळेकर, स्मिता सावंत, माधुरी ताकारे, रेखा जाधव आदी सहभागी झाले होते.

आकडा कुठला खरा
पूर्वी आकडा निघायचा त्यासाठी रेकॉर्ड बघितले जायचे. एक आकडा मुंबईचा व एक कल्याणचा. मुख्यमंत्री रोज वेगळा आकडा सांगत आहेत, नक्की त्यांचा आकडा कुठला ? असा प्रश्‍न करून श्री. पवार म्हणाले, ‘रोज शासनाकडून वेगवेगळी माहिती मागवली जात आहे. रोजच्या आदेशाने एका अधिकाऱ्यांनी तर मला पिल्याशिवाय झोपच लागत नाही, असे आपल्याला सांगितले आहे.’

कार्यकर्त्यांना पवार यांचा डोस
मोर्चा बॅंकेसमोर आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी झाडाखाली किंवा इमारतीचा आडोसा घेतला. याचा संदर्भ घेत श्री. पवार यांनी या कार्यकर्त्यांना चांगलाच डोस दिला. एकीकडे महिला उन्हात उभ्या असताना कार्यकर्ता, पदाधिकारी सावलीत कशाला उभे राहता. अशा लोकांनी घरी जावावे, त्यांची आंदोलनाला किंवा शिवसेनेला गरज नाही, या शब्दात त्यांनी अशा कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.  

दादा याद्या घ्या
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. हा कोल्हापूरसाठी मोठा सन्मान आहे. आता त्यांनीच जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी घ्यावी, असे आवाहन श्री. पवार यांनी या वेळी केले. 

Web Title: kolhapur news dhol-tasha rally on district bank by shivsena