कोल्हापूरातील फराळ, आकाशकंदील परदेशात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - आकाशकंदिलासह अस्सल कोल्हापुरी चवीचा फराळ यंदा जगभरातील विविध देशांत जाणार आहे. मस्कत आणि कॅनडा येथील रेस्टॉरंटसाठी अनुराधा उजागरे यांनी येथील चेतना अपंगमती विद्यालयातून आकाशकंदील नेले. स्वयंसिद्धा संस्थेतून सीमेवरील जवानांसाठी आज एका ग्राहकाने ५० हजार रुपयांच्या फराळाची खरेदी केली. 

कोल्हापूर - आकाशकंदिलासह अस्सल कोल्हापुरी चवीचा फराळ यंदा जगभरातील विविध देशांत जाणार आहे. मस्कत आणि कॅनडा येथील रेस्टॉरंटसाठी अनुराधा उजागरे यांनी येथील चेतना अपंगमती विद्यालयातून आकाशकंदील नेले. स्वयंसिद्धा संस्थेतून सीमेवरील जवानांसाठी आज एका ग्राहकाने ५० हजार रुपयांच्या फराळाची खरेदी केली. 

दरम्यान, प्रदूषणमुक्त प्रकाशोत्सवासाठी विविधरंगी कागदांपासून तयार केलेल्या हॅन्डमेड आकाशकंदिलांनाही यंदा मागणी वाढली आहे. ‘चायनामेड इव्हेंटी दिवाळी करण्यापेक्षा पर्यावरणपूरक दिवाळीसाठी प्रसन्न आकाशकंदील’ असा संदेश देत शहरातील विविध ठिकाणी अशा आकाशकंदिलांचे स्टॉल सजले आहेत.

चाळीस हजार पणत्या 
येथील विविध विशेष मुलांच्या शाळांतील उद्योग केंद्रातही आकाशकंदिलासह पणत्या, उटणे तयार करण्याची धांदल उडाली आहे. एकट्या चेतना अपंगमती विद्यालयातील मुलांनी यंदा आठ हजारांवर गिफ्ट बॉक्‍सेस तयार केले आहेत. साबण, उटणे, तेल, पणत्या  आणि अत्तराचा या बॉक्‍समध्ये समावेश आहे. त्याशिवाय, ४० हजार पणत्यांची ऑर्डर संस्थेकडे आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यंदा संस्थेतील मुलांनी ५०० किलो सुगंधी उटणे तयार केले असून, त्यालाही मोठी मागणी आहे. 

परदेशातील प्रियजनांसाठी सुविधा
येथील सात्विक फाउंडेशनने यंदा अर्धा आणि एक किलोच्या बॉक्‍स पॅकिंगमध्ये फराळ उपलब्ध केला आहे. त्याशिवाय सव्वाशे, दोनशे आणि पाचशे रुपये अशा किमतीचे गिफ्ट बॉक्‍सही तयार केले असून, त्यातून फराळातील काही निवडक पदार्थ देता येणार आहेत. परदेशातील प्रियजनांसाठी सहा व आठ किलोचे विशेष पार्सल तयार केले असून, त्याबरोबर इतर वैयक्तिक अर्धा किलोपर्यंतचे साहित्यही पाठविता येणार आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, राजारामपुरीत बुधवार (ता. १२)पासून स्टॉल सुरू होणार असल्याचे फाउंडेशनच्या खजानीस सारिका बकरे यांनी सांगितले.

चार हजार किलो फराळ
दिवाळीत फराळाची उलाढाल मोठी होते. या पार्श्‍वभूमीवर विविध महिला बचतगट आणि महिला संस्था गेला महिनाभर फराळ तयार करण्यात व्यस्त आहेत. येथील स्वयंसिद्धा या महिलांच्या शिखर संस्थेने एक ऑक्‍टोबरपासून फराळाच्या ऑर्डर नोंदवायला सुरुवात केली आहे. आजअखेर चार हजार किलो फराळाची ऑर्डर संस्थेकडे नोंद झाली. फराळातील विविध प्रकारचे ३२ पदार्थ संस्थेच्या ४२ महिला सभासद तयार करतात. त्यातही संस्थेच्या चकली, चिरोटे आणि पुडाची वडी या पदार्थांना मोठी मागणी असते. बुधवार (ता. ११)पर्यंतच संस्थेत फराळाच्या ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत. 

Web Title: Kolhapur News Dipawali Sweets export